कोणताही गाजावाजा न करता चर्चेत आले खरे पण, लोकसभा निवडणूक संपताच “नमो” बेपत्ता झाले !!

वाटलंच !! लोक वेगळ्याच “नमो ” विषयी विचार करतील . प्रधान सेवक चौकीदार “नमो ” तिकडे केदारनाथ , बद्रीनाथाच्या दर्शनात ध्यान साधना करण्यात व्यस्त आहेत आणि हे सगळ्या देशाला त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माध्यमांच्या प्रतापाने माहित आहे . म्हणून हि बातमी त्यांच्याविषयी नाही तर हि बातमी आहे मोठ्या उत्साहाने सुरु केलेल्या ” नमो ” टीव्ही चॅनल विषयीची !! म्हणजे ” अकस्मात लोकांच्या घरातील छोट्या पडद्यावर आलेल्या नमो टीव्ही चॅनलची !! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकतच्या जमान्यात अगदी फुकट नमो टीव्ही लोकांच्या घरात अक्षरशः घुसवण्यात आला होता. ज्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. आता निवडणूक संपताच नमो चॅनल ” बेपत्ता ” झाले आहे.
विरोधकांनी या “नमो” टीव्हीवर जोरदार टीका केली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी यावरुन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला लक्ष्य केलं होतं. नियम धाब्यावर बसवून या वाहिनीला परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला. सरकारनं आपला प्रपोगेंडा राबवण्यासाठी ही वाहिनी आणल्याचा आरोपदेखील झाला होता. टाटा स्काय, व्हिडीओकॉन, डिश टीव्हीवर नमो टीव्ही वाहिनी मोफत दाखवली जात होती.
अनेक लोकांनीही आम्हाला इतर टीव्ही चॅनल वर दिसतात तेवढे नमो ठीक आहेत परंतु आणखी हे नको म्हणून ओरड केली होती. त्याच्या ऑडिओ टेपही सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झालाय होत्या. २६ मार्चला लोकसभा निवडणूक सुरू होण्याच्या काही दिवस आधी “नमो” चॅनल डीटीएचवर दिसू लागले होते . खरे तर त्याआधी या वाहिनीची कोणतीही जाहिरात दिसली नव्हती. अचानकच चॅनलच्या बाजारात ” नमो”ची एंट्री करण्यात आली होती . या टीव्हीवर २४ तास कायम पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं, मुलाखती आणि कार्यक्रम दाखवले जायचे. अचानक आपल्या डीटीएचवर ही वाहिनी पाहून प्रेक्षकांना धक्का बसला होता.
वाद झाल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं निवडणूक आयोगानं वाहिनीला नोटीस बजावली. ही वाहिनी नोंदणीकृत नसल्याचं उत्तर मंत्रालयानं निवडणूक आयोगाला दिलं होतं. वाहिनी नोंदणीकृत नसल्यानं तिच्या प्रेक्षपणासाठी परवानगीची आवश्यकता नाही, असंदेखील मंत्रालयानं उत्तरात नमूद केलं होतं. यामुळे विरोधकांनी आयोग आणि मंत्रालयावर टीकेची झोड उठवली होती. आता मतदान संपताच नमो टीव्ही गायब झाल्यानं केवळ निवडणुकीसाठी ही वाहिनी सुरू करण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.