…आणि नवरीला सासरी घेऊन जाण्यासाठी उतरले हेलिकॉप्टर !!

अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील साकुरी येथे पार पडलेल्या एक विवाह सोहळाची ही बातमी आहे. मुलीची इच्छा म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी या मुलीची चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवणी केली आहे. त्यामुळे सध्या नगरमध्ये याच लग्नाची चर्चा रंगली आहे.
या विषयीची अधिक माहिती अशी कि, शिर्डी जवळच असलेल्या साकुरी येथे दंडवते यांची मुलगी अंजलीचा विवाह सोहळा थाटात पार पडला. दंडवते हे सधन शेतकरी असल्याने त्यांनी लेकीचं लग्न धुमधडाक्यात लावून दिले. हे लग्न थाटामाटात पार पडल्याने सर्वच जण आनंदी असताना अचानक मंगल कार्यालयाबाहेर हेलिकॉप्टर अवतरल्याने सर्वांनाच त्याचं कुतूहल वाटलं. अंजलीच्या पाठवणीसाठी हे हेलिकॉप्टर आल्याचं कळताच सर्वांना सुखद धक्का बसला. त्यामुळे अंजलीही भारावून गेली. त्यानंतर अंजली आणि तिच्या पतीने साकुरी ते शिरूर अशी हवाई सफर केली. लग्नापूर्वी अंजलीने हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिची ही इच्छा पूर्ण करत तिला सुखद धक्का दिला. तर हेलिकॉप्टरमध्ये बसलेली मी कुटुंबातील पहिलीच मुलगी आहे, असे अंजलीने सांगितले.