Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यात तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघात मंगळवारी मतदान

Spread the love

२ कोटी ५७ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात १४ मतदार संघामध्ये मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून २४९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या टप्प्यात २ कोटी ५७ लाख ८९ हजार ७३८ मतदार मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

तिसऱ्या टप्प्यात २४९ उमेदवारांमध्ये १९ महिला उमेदवार असून बारामती मतदार संघात सर्वाधिक चार महिला उमेदवार आहेत. तर पुणे व माढा मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी ३१ उमेदवार असून सर्वात कमी  ०९ उमेदवार हे सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत. याशिवाय जळगाव (१४),रावेर (१२), जालना (२०), औरंगाबाद (२३), रायगड (१६), बारामती (१८),अहमदनगर (१९), सांगली (१२), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (१२), कोल्हापूर (१५) व हातकणंगले (१७) उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

या टप्प्यासाठी ५६ हजार ०२५ बॅलेट युनिट तर ३५ हजार ५६२ कंट्रोल युनिट देण्यात आली आहेत. तसेच ३७ हजार ५२४ व्हीव्हीपॅट यंत्रे सुद्धा या चौदा मतदार संघात देण्यात आली आहेत.  या टप्यातील प्रक्रियेसाठी एकूण १ लाख ४१ हजार ११३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, १७ हजार १९२ कर्मचाऱ्यांना राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे.  तिसऱ्या टप्प्यात या मतदारसंघात एकूण १ कोटी ३३ लाख १९ हजार १० पुरुष तर १ कोटी २४ लाख ७० हजार ७६ महिला आणि ६५२ इतर नागरिक मतदान करणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील मतदार संघ, त्यातील मतदान केंद्रे, कंसात एकूण मतदार संख्या पुढीलप्रमाणे –

मतदान होणारे मतदार संघ : जळगाव – 2013 मतदान केंद्रे (एकूण मतदार 19 लाख 25 हजार 352), रावेर – 1906 मतदान केंद्रे (17 लाख 73 हजार 107),जालना – 2058 मतदान केंद्रे (18 लाख 65 हजार 20), औरंगाबाद – 2021 मतदान केंद्रे (18 लाख 84 हजार 865), रायगड – 2179 मतदान केंद्रे (16 लाख 51 हजार 560), पुणे – 1997 मतदान केंद्रे (20 लाख 74 हजार 861), बारामती– 2372 मतदान केंद्रे (21 लाख 12 हजार 408), अहमदनगर – 2030 मतदान केंद्रे (18 लाख 54 हजार 248), माढा – 2025 मतदान केंद्रे (19 लाख 4 हजार 845), सांगली – 1848 (18 लाख 3 हजार 53), सातारा – 2296 मतदान केंद्रे (18 लाख 38 हजार 987), रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 1942 मतदान केंद्रे (14 लाख 54 हजार 524), कोल्हापूर – 2148 (18 लाख 74 हजार 345), हातकणंगले – 1856 (17 लाख 72 हजार 563).

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.

मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

मतदानासाठी आवश्यक 11 दस्तावेज

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!