“पंतप्रधान नरेंद्र मोदी”चा मार्ग न्यायालयाने केला मोकळा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेल्या या बायोपिकला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने शुक्रवारी दखल घेत निवडणूक आयोगाला नोटी बजावली होती. याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणीही न्यायालयाने मान्य करत सोमवारी सुनावणी ठेवली.
आरपीआय (आय)चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी अॅड्. गणेश गुप्ता आणि तौसिफ शेख यांच्यामार्फत शुक्रवारी ही याचिका मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सादर केली. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाला आमचा विरोध नाही. परंतु ज्या पाश्र्वभूमीवर तो प्रदर्शित करण्याचा घाट जातो आहे त्याला आमचा विरोध आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता सध्या देशभर लागू आहे. त्यामुळे आता हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर ते आचारसंहितेचे उल्लंघन होईल. शिवाय आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी यांना या चित्रपटामुळे मोठय़ा प्रमाणावर राजकीय फायदा होईल. म्हणूनच सध्या तरी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली होती.