Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महा आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ : मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले : शरद पवार

Spread the love

शेतकरी, गोरगरीब, वंचित यांच्यासह देशातील सर्व नागरिकांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी कराडमध्ये केली. कराड  आघाडीच्या प्रचाराला  प्रारंभ करण्यात आला . राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार जोगेंद्र कवाडे आदी व्यासपीठावर होते.

पंतप्रधान मोदी आणि राज्यकर्त्यां भाजपचा गैरकारभार, सरकारने केलेली फसवणूक आणि सरकारमुळे निर्माण झालेल्या धोक्यासंदर्भात लोकांना आता फार सांगण्याची गरज नाही. त्यांनी जवानांच्या शौर्याचे राजकारण केले, नोटबंदीतून काळा पैसा बाहेर काढण्याचे आश्वासन शंभर टक्के खोटे ठरवले, असे पवार म्हणाले.

सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार प्रारंभानिमित्त कराड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, की भाजप सरकार देशातील न्याययंत्रणा, केंद्रीय गुप्तचर विभाग, रिझव्‍‌र्ह बँक अशा स्वायत्त संस्थांवर दबाव आणून त्यांचा वापर स्वत:साठी करीत आहे. शेतकऱ्यांची पार दुरवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांत केवळ महाराष्ट्रात १२ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतमालाचे दर पाडून हे सरकार ‘खाणाऱ्यां’ची काळजी घेत आहे. याबाबत आपण खुद्द पंतप्रधान मोदींशी चर्चा केली असता, देशाचा पोशिंदा-शेतकरी जगला पाहिजे याबाबत पंतप्रधान संवेदनशील नसल्याचे स्पष्ट झाले. ना खाऊंगा ना खाने दुंगा हे त्यांचे आश्वासन फसवे ठरले आहे.

लढाऊ राफेल विमानांच्या खरेदीचं एक उदाहरण पाहता कित्येक पटीने या विमानांची किंमत वाढवून गैरव्यवहार झाला. ज्या अंबानींनी साधे कागदाचे विमानही तयार केले नाही त्यांना राफेलचा ठेका दिला गेला. ठेका दिल्यानंतर यासंदर्भात अंबानींची कंपनीच कुठे नसल्याचेही उघडकीस आले. राफेलचा हिशोब द्यायला ते घाबरत असल्यानेच मोदी सरकारचे व्यवहार स्वच्छ नसल्याचे सिद्ध झाले आहे, असा घणाघातही पवार यांनी केला. बोफोर्स तोफा खरेदींच्या चौकशीला राजीव गांधी घाबरले नव्हते, मग राफेलच्या चौकशीला मोदी सरकार का घाबरते, असा सवालही पवार यांनी या वेळी केला.

मोदी सरकारने पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय जवानांनी केलेल्या कामगिरीचे राजकारण केले. जीनिव्हा करारानुसार पाकिस्तानच्या ताब्यातील वायूदलाचे अधिकारी अभिनंदन यांना सोडण्यात आले, पण ५६ इंचाची छाती दाखवत मोदींनी त्याचेही राजकारण केले. तुमची छाती ५६ इंचाची तर मग, कुलभूषण जाधव यांना परत आणण्यात ती कामी का आली नाही, असा परखड सवालही पवार यांनी उपस्थित केला. जखमी जवानांची विचारपूस न करणारे मोदी जवानांच्या शौर्याचे राजकीय लाभ घेत आहेत. पण, जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याखेरीज राहणार नाही, असे भाकीत शरद पवार यांनी केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गेल्या निवडणुकीत आमची एकजूट नसल्यामुळेच मतविभागणी होऊन भाजप सत्तेत आला. आता आम्ही एकजूट केली आहे. परंतु, साम, दाम, दंड, भेद याचा वापर करीत आमचेच कार्यकर्ते फोडून ते उमेदवार म्हणून आमच्यासमोर उभे केले जात आहेत. जनतेचा कौल पाहता भाजप सत्तेतून जाईल. पण, नरेंद्र मोदींसारखा हुकूमशहा सत्तेत राहिल्यास या देशाचे संविधान व लोकशाहीही राहणार नाही.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!