परळीत माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची हत्या

परळी येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची अज्ञात इसमांनी तलवारीने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटे झालेल्या या हल्ल्याने परळीत एकच खळबळ उडाली आहे.
परळी येथील उड्डाणपुलाखाली पांडुरंग गायकवाड यांची आज पहाटे हत्या करण्यात आली. काही अज्ञात इसमांनी गायकवाड यांच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. त्यामुळे ते जागीच ठार झाले. या हल्ल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी अंतर्गत वादातून ही हत्या झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. गायकवाड यांच्या पत्नी मीनाबाई गायकवाड या विद्यमान नगरसेविका आहेत.