Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गोव्यात काँग्रेसकडून सत्तास्थापनेचा दावा, राज्यपालांची घेतली भेट

Spread the love

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला असून सोमवारी दुपारी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आमच्याकडे १४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोव्यातील भाजपा सरकार देखील अडचणीत आले आहे. पर्रिकर आणि डिसोझा या दोन भाजपा आमदारांचे निधन तसेच दोघांचा राजीनामा यामुळे ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेचे संख्याबळ ३६ वर आले आहे. त्यात काँग्रेसचे १४, तर भाजपचे १२ आमदार आहेत. सोमवारी दुपारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची राज भवनात भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला.

मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी कार्यक्रम आज दुपारी तीन वाजता होणार असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेस नेते चंद्रकांत कावळेकर यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून आमच्याकडे १४ आमदार आहे आणि आम्हाला सत्तास्थापनेसाठी संधी दिली पाहिजे, आम्हाला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी, अशी विनंती राज्यपालांना केल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी दावा केला असतानाच भाजपाच्या गोटातही सत्ता टिकवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत एकमत झालेले नाही. दुपारी तीन वाजता मुख्यमंत्रीपदासाठी शपथविधीचा कार्यक्रम होईल, तोवर चित्र स्पष्ट होईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!