Gully Boy : अमिताभच्या पत्राने गली बॉय सिद्धांत झाला खुश …

अभिनेता रणवीर सिंहच्या ‘गली बॉय’नं प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचीही मनं जिंकली आहेत. चित्रपटातील भूमिकेसाठी रणवीरबरोबरच त्याचा सहकलाकार सिद्धांत चतुर्वेदी याच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. साक्षात महानायक अमिताभ बच्चन यांनी पत्र लिहून सिद्धांतच्या अभिनयाला दाद दिली आहे. सिद्धांतनं स्वत: इन्स्टाग्रावर फोटो शेअर करून ही माहिती दिलीय. अमिताभ यांनी सिद्धांतला पुष्पगुच्छ आणि शुभेच्छासंदेश पाठवला आहे. ‘गली बॉय’ पाहिला आणि राहावलं नाही. त्यामुळं तुला हे पत्र पाठवतोय. कोणत्याही चित्रपटात कॅमेऱ्यासमोर सहजतेनं वावरणं अत्यंत कठीण असतं. पण तू ते केलंस. तुझ्या अभिनय कारकिर्दीला शुभेच्छा’ असा अमिताभ यांनी संदेशात म्हटलंय. अमिताभ यांच्या कौतुकानं भारावलेल्या सिद्धांतनं ते पत्र आणि पुष्पगुच्छ हातात घेऊन एक फोटो शेअर केलाय. ‘तुम्ही दिलेली भेट आणि आशीर्वाद माझ्यासाठी मौल्यवान आहे. हा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही. माझ्यासाठी हा भाग्याचा आणि गौरवाचा क्षण आहे. प्रत्यक्ष भेटून आपला आशीर्वाद घेण्याची इच्छा आहे,’ अशा शब्दांत सिद्धांतनं अमिताभ यांचे आभार मानले आहेत. सिद्धांत चतुर्वेदीनं ‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंह म्हणजेच, मुरादला ‘रॅपर’ बनण्यात मदत करणाऱ्या ‘एमसी शेर’ची भूमिका साकारली आहे.