सीबीएसईची दहावी-बारावीच्या परीक्षा उद्यापासून

यंदा सीबीएसईची दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप बदलले
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या यंदाच्या बोर्डाच्या परिक्षेपासून प्रश्नपत्रिकांचे स्वरुप बदलण्यात आले असून ते विद्यार्थ्यांशी अनुकूल असे अधिक सोपे करण्यात आले आहे. त्यानुसार, सीबीएसईने वस्तूनिष्ठ प्रश्नांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर प्रश्नपत्रिकांमध्ये १० टक्के वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात होते. मात्र, आता यात वाढ करुन ते २५ टक्के करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा परिक्षा देताना आत्मविश्वास वाढेल तसेच त्यांना परिक्षेत अधिक गुणही मिळवता येतील असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत शंका असेल किंवा त्याला उत्तर येत नसेल तर त्याच्याकडे ३३ टक्के जास्त प्रश्न उपलब्ध असतील. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना विविध प्रकारे उत्तरे लिहीता येतील असे अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रत्येक पेपरला उपविभागांमध्येही विभाजीत केले जाणार आहे.
प्रश्नपत्रिका फुटण्यापासून रोखण्यासाठीही यावेळी विशेष पावले उचलण्यात आली आहेत. संवेदनशील वस्तूंना एकत्र करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय अधीक्षकांना विशिष्ट मोबाईल अॅप्लिकेशनचा उपयोग करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लाईव्ह पद्धतीने नजर ठेवण्यात येणार आहे. यावर्षी सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी १२वीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली आहे. तर १०वीच्या परिक्षेसाठी १८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन दिवसांनी अर्थात १५ फेब्रुवारीपासून या परीक्षा सुरु होणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या परिक्षा १५ दिवस आधीच घेण्यात येत आहेत. व्होकेशनल विषयांची परिक्षा फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत पूर्ण होणार आहेत त्यानंतर मार्चमध्ये शैक्षणिक विषयांवरील परिक्षांना सुरुवात होणार आहे.