वैद्यकीय सुविधा स्वस्तात उपलब्ध व्हाव्यात – राज्यपाल

मेडइन्स्पायर आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन
जीवनशैलीशी संबंधित आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असून एकीकडे हे आव्हान पेलताना आपल्याकडे दर्जेदार वैद्यकीय सुविधा स्वस्तात सर्वत्र उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे राज्यपाल चे विद्यासागर राव म्हणाले. सोशल मीडियावरील चुकीचे आरोग्य सल्ले रोखणेही आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ डी वाय पाटील विद्यापीठ येथे आयोजित मेडइन्स्पायर या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील यांची देखील यावेळी उपस्थिती होती.
याप्रसंगी राज्यपालांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेटही प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दि फ्युचर स्टँडस टुडे या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर जयवंत सुतार, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार, पालिका आयुक्त रामास्वामी, डॉ डी वाय पाटील विद्यापिठाचे कुलपती डॉ. विजय पाटील, शिवानी पाटील, डॉ. नंदिता पालशेतकर हे देखील परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.