हिंदीला अबुधाबी न्यायालयात अधिकृत भाषेचा दर्जा

संयुक्त अरब आमिरातमधील अबुधाबीने न्यायालयातील तिसरी अधिकृत भाषा म्हणून हिंदीला मान्यता दिली. यापूर्वी अबुधाबीतील न्यायालयामध्ये अरबी व इंग्रजी या अधिकृत भाषा होत्या. त्याबरोबर आता हिंदीचाही समावेश करण्यात आला आहे. न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा समावेश केल्यामुळे तेथील हिंदी भाषिकांना कायदाप्रक्रिया, त्यांचे अधिकार व कर्तव्ये याविषयी जाणून घेण्यास मदत होईल, असे अबुधाबीच्या न्याय विभागाने म्हटले आहे. संयुक्त अरब आमिरातची एकूण लोकसंख्या ५० लाख असून त्यांपैकी दोनृतृतीयांश स्थलांतरित आहेत. तेथील भारतीयांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के इतके असून, परदेशातून येऊन यूएईमध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे.