महाराष्ट्राचे राजकारण आणि आघाड्यांची चर्चा…

कोण कोणाबरोबर जाणार ? वंचित आघाडी आणि मनसेकडे सर्वांचेच लक्ष !!
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राजकीय डावपेच आखण्यास सर्च पक्षांनी हालचाली सुरु केल्या असून सध्या जे मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत आहेत त्यापैकी भाजप -सेने एकत्र येणार का ? मनसे आणि राज ठाकरे कुणाबरोबर जाणार ? आणि सर्वात महत्वाचा चर्चेचा विषय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी काँग्रेस -राष्ट्रवादीचे जुळणार कि ते स्वतंत्र लढणार ? विशेष म्हणजे सर्वांच्याच युती आणि आघाड्यांच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्यात आहेत. चर्चा अशी आहे कि , महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये प्रत्येकी 20-20 जागा लढवण्यावर जवळपास एकमत झालं आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला आठ जागा सोडण्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीचं जवळपास निश्चित केलं आहे. त्यातील चार जागा काँग्रेस आणि चार जागा राष्ट्रवादीनं प्रकाश आंबेडकरांसाठी सोडण्यास तयारी दाखवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्यास त्यांच्या 6 जागा निवडून येण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. परंतु भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे 20 जागांची मागणी केली आहे. 2014 मध्ये 26:22 असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र हातकणंगलेमध्ये राष्ट्रवादीला उमेदवारच न मिळाल्याने ती जागा अखेर काँगेसने लढवली होती. म्हणजेच गेल्या निवडणुकांत काँगेस 27 तर राष्ट्रवादी 21 जागांवर लढली होती. रायगड आणि हिंगोलीच्या जागांची तेव्हा अदलाबदल करण्यात आली होती. महाराष्ट्राचा भौगोलिक आणि सामाजिक इतिहास हा गरीब मराठा, आदिवासी, ओबीसी, दलित, बहुजन, मुस्लिम, धनगर समाजांची मोट बांधून सत्तेच्या टापूला धक्का देणारा आहे. हा वंचित समाज निर्णायक ठरू शकतो, याची पुरेपूर कल्पना अॅड. आंबेडकर यांना आहे.
काँग्रेस -राष्ट्रवादीची चर्चा काहीही असली तरी प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत आम्ही स्वतंत्र उमेदवार देऊ, असंही जाहीर केलं होतं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. काँग्रेसची महाराष्ट्रात अजिबात ताकद राहिलेली नाही. काँग्रेसकडे चांगला चेहराच नाही. मुंबई, ठाणे आणि पुण्यात काँग्रेसकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारही नाहीत. काँग्रेसचे अनेक नेते भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत. रॉबर्ट वड्रा, चिदंबरम हे भ्रष्टाचारात गुरफटलेले आहेत. अशोक चव्हाणही त्याच प्रकारातील नेते आहेत. काँग्रेसनं मुकाट्यानं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेस कोणत्याही अटी आणि शर्थी ठेवण्याच्या स्थितीत नाही, अशी टीकाही काँग्रेसवर केली होती. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष नव्हे, तर गल्लीबोळातला झाल्याची टीकाही त्यांनी केली होती.