Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : जे. के. जाधव यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा , जमीन, बँकेतील गैरव्यवहार उघडकीस

Spread the love

 

औरंगाबाद : अतिक्रमीत जागेचा वाद न्यायालयात सुरू असताना लोकविकास नागरी सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष जे. के. जाधव (७३) यांनी खातेदाराच्या खात्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकाशी संगनमत करुन २२ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय लखूजी औटी (४५) व व्यवस्थापक भगवान डोळे (५५) यांचाही समावेश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , चिकलठाणा एमआयडीसीमध्ये किसन मुरलीधर भादे (७०, रा. श्री समर्थ गजानन हाऊसिंग सोसायटी, भुखंड क्र. ९, गट क्र. ८८, सातारा परिसर) यांची चिकलठाणा एमआयडीसी येथे भागीदारीमध्ये आनंद इंडस्ट्री या नावाने फर्म होती. भादे यांच्यासोबत ३० सप्टेंबर १९८६ पासून हर्षला एकनाथ जाधव व क्रांती जगन्नाथ जाधव यांची ५१ टक्के भागीदारी होती. आनंद इंडस्ट्रीजच्या नावाने सन १९९९ ला लोकविकास नागरी सहकारी बँकेत चालु खाते उघडले होते. त्यावेळेस बँकेच्या अधिका-यांनी तिघांच्याही स्वाक्ष-यांचे नमुने घेतले होते. तेव्हापासून आनंद इंडस्ट्रीच्या खात्याचा व्यवहार कार्यकारी भागीदारी म्हणून हर्षला जाधव याच पाहत होत्या.

बँकेने कोणतीही माहिती दिली नाही

दरम्यान आनंद इंडस्ट्रीजचे उत्पादन सन २०११ पासून बंद असल्यामुळे बँक खात्यात व्यवहार झाला नाही. इंड्स्ट्रीजला केवळ प्राप्तीकर विवरण आणि मिळकतीचा कर भरण्याशिवाय कोणताही खर्च नव्हता. हा खर्च करण्याचा अधिकार कार्यकारी भागीदार हर्षला जाधव यांच्याकडे होता. आॅक्टोबर २०१९ मध्ये भादे हे आस्थापनेच्या मालकीच्या भुखंडावर गेले. त्यावेळी त्यांना तेथे भाडेकरु दिसून आले. म्हणून त्यांनी विचारणा केली. तेव्हा त्यांना ही जागा जे. के. जाधव यांनी नियमीत १३ हजार पाचशे रुपये भाडे तत्त्वावर दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भादे यांनी आस्थापनेच्या कार्यकारी भागीदार हर्षला जाधव यांना प्रकरण सांगितले. तेव्हा हर्षला जाधव यांनी आस्थापनेचा व्यवहार आणि उत्पादन बंद असल्यामुळे त्या खात्यात त्यांनी कोणताही व्यवहार केलेला नाही. असे म्हटल्यावर भादे यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना पत्र पाठवत आस्थापनेचे खाते कोण चालवित आहे. याबाबत माहिती मागवली. पण बँकेचे अध्यक्ष जे. के. जाधव असल्यामुळे त्यांच्या दबावासमोर बँकेने कोणतीही माहिती दिली नाही.

असा केला गैरव्यवहार

पोलिसात दाखल तक्रारीनुसार जे. के. जाधव यांनी ७ सप्टेंबर २०२० रोजी बँकेला पत्र देत त्यासोबत बनावट दस्तावेज तयार केला. या पत्रासोबत आनंद इंडस्ट्रीजचे बनावट उद्यम नोंदणी प्रमाणपत्र सादर केले. बँकेच्या अधिका-यांना हाताशी धरुन आनंद इंडस्ट्रीजची आस्थापनाच्या स्वाक्ष-यांच्या नमुन्यांचे कार्ड तयार करुन ते खात्यात जमा केले. त्याचे बनावट दस्तावेज खात्याशी जोडण्यात आले. अशाप्रकारे त्रिकुटाने ४ एप्रिल २०१२ ते १७ आॅगस्ट २०२० याकाळात भादे यांची फसवणूक केली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विजय जाधव हे करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!