AurangabadNewsUpdate : अखेर पोलिसांनी लावला “त्या ” वृद्ध महिलेला जंगलात सोडणाऱ्या कुटुंबीयांचा छडा….

Spread the love

औरंगाबाद शहरानजीक असलेल्या कच्ची घाटी परिसरातील जंगलात मध्यरात्री टाकून गेलेल्या एका आजारी वृद्ध  महिलेचा जीव चिकलठाणा पोलिसांमुळे बचावला. तीन ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता ही महिला कच्ची घाटी ते पीरवाडीकडे या रस्त्यावरील जंगलातील नाल्यात पडली होती. दरम्यान या वृद्ध महिलेला टाकून देणारी तिच्या बहिणीची सून आणि तिला मदत करणाऱ्या रिक्षाचालकाविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , तीन ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास औरंगाबाद शहरानजीकच्या कच्ची घाटी जवळील जंगलात एक महिला विव्हळत पडली असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक महेश आंधळे यांना मिळाली. त्यानंतर आंधळे यांनी पथकासह घटनास्थळ जाऊन  या महिलेची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता ती मुकबधीर आणि अंध असल्याचे दिसून आले. हे लक्षात येताच आंधळे यांनी नागरिकांच्या मदतीने वृद्ध महिलेला तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दरम्यान औरंगाबादच्या  पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना याबाबत  माहिती देण्यात आली असता, त्यांनी  या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिलेला टाकून देणाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना सहाय्यक निरीक्षक आंधळे यांना दिल्या. त्यानुसार सदर वृद्ध महिलेचे छायाचित्र घेऊन चिकलठाणा पोलिसांनी आसपासच्या गावांतील परिसर पिंजून काढला असता  सदर वृद्ध महिला ब्रीजवाडी, नारेगाव येथील असल्याची माहिती मिळाली.

याबाबत पोलीसांनी अधिक चौकशी केली असता, या महिलेचा सांभाळ  तिच्या बहिणीची सून गेल्या आठ ते दहा वर्षांपासून करीत होती, मात्र तिच्या आजारपणाला कंटाळून तिने गल्लीत राहणारा रिक्षाचालक अमीर मुन्नाखान याच्या मदतीने कच्ची घाटी येथील जंगलात सोडल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी या सुनेला आणि अमीर मुन्नाखान याला ताब्यात घेतले असता त्यांनी याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिस नाईक रवींद्र साळवे यांच्या तक्रारीवरून आरोपी सून आणी रिक्षाचालक अमीरविरुद्ध माता, पिता आणि जेष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक आंधळे, जमादार अजिनाथ शेकडे, रवींद्र साळवे आणि सोपान डकले यांनी केली.

आपलं सरकार