Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महा जनादेश यात्रा : बारामतीच्या राड्यावरून मुख्यमंत्र्यांनी पवारांसमोर उपस्थित केले प्रश्न

Spread the love

“शरद पवारांच्या बारामतीमध्ये जाण्यास आणि तिथे सभा घेण्यास लोकशाहीमध्ये मनाई आहे का? बारामतीत काय कलम ३७० लागू आहे का?”, असा सवाल करत मुख्यमंत्री म्हणाले “तुम्ही (शरद पवार) देखील आमच्या इथे येऊन सभा घ्या. आम्ही तुम्हाला मदत करू”, असे उत्तर त्यांनी राष्ट्रवादीला दिले. बारामतीत महाजनादेश यात्रेदरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

भाजपाची महाजनादेश यात्रा रविवारी पुण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. “भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध पक्षातील नेते मंडळी प्रवेश करीत आहे. कोणत्या जागा कोणी लढवायच्या हे पाहूनच पक्षात इनकमिंग सुरू आहे. आतापर्यंत मेगा भरती झाली. पण यापुढे मेगा भरती नसून भरती सुरू राहणार आहे”, आगामी काळात पुन्हा भाजपामध्ये मेगा भरती केव्हा होणार या प्रश्‍नावर त्यांनी भूमिका मांडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सेनेला कार्यक्रमादरम्यान प्रचंड प्रतिसाद मिळत असून, कार्यकर्त्यांमध्ये युती केव्हा होणार आणि जागा वाटपाबाबत उत्साह आहे. यावर कोणीही काळजी करू नये, लवकरच युतीची घोषणा केली जाईल”, अशी माहिती त्यांनी दिली.

उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशावर फडणवीस म्हणाले की, “उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशावरून राष्ट्रवादीमधून टीका होत आहे. जोपर्यंत ते सोबत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मते मागताना आनंद मिळत होता. राष्ट्रवादीकडून काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा ही उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली काढावी, असा आग्रह होता. पण जी द्राक्षे मिळत नाही, तेव्हा ती आंबट असतात”, अशी टीका त्यांनी केली.

“काल (शनिवार) बारामती दौऱ्यात पाच ते सात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलीस त्यांच्याकडे येत असल्याचे दिसताच त्यांनी तेथून पळ काढला. मात्र या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. अशा बातम्या पसरवल्या जात आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नसून पोलिसांनी असा कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज केलेला नाही”, असे त्यांनी स्पष्ट केले. हाच मुद्दा पकडत ते पुढे म्हणाले की, “बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे का? शरद पवारांच्या बारामतीमध्ये जाण्यास आणि तिथे सभा घेण्यास लोकशाहीमध्ये मनाई आहे का? असा सवाल उपस्थित केला. तुम्ही देखील आमच्या इथे येऊन सभा घ्या, आम्ही तुम्हाला मदत करू”, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

होर्डिंग लावून कोणाला तिकीट मिळत नाही –

महा जनादेश यात्रे मुळे शहरात ठीक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स बाजी करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “अशा प्रकारची होर्डिंगबाजी करणे चुकीचे आहे. शहराच्या अध्यक्षांना मी याबाबत सूचना देखील दिल्या आहेत. तसेच होर्डिंग लावून कोणाला तिकीट मिळत नाही. असे होर्डिंग लावणाऱ्यांची चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!