Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC World Cup 2019 : श्रीलंकेकडून इंग्लंडवर २० धावांनी विजय, सामनावीराचा मान मलिंगाला

Spread the love

अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने यजमान इंग्लंडवर २० धावांनी विजय मिळवत विश्वचषक स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. या विजयासह श्रीलंकेच्या खात्यात आता एकूण ६ गुण जमा झाले आहेत. टिच्चून मारा करणाऱ्या लसिथ मलिंगा याला सामनावीरघोषित करण्यात आले. आजच्या सामन्यावर एकूणच गोलंदाजांचे श्रीलंकेने विजयासमोर ठेवलेल्या २३३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचीही दाणादाण उडाली. सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रोला (०) पायचीत करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. जो रुट आणि बेन स्टॉक्स यांचा अपवाद वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकला नाही. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर इंग्लंड संघ ढेपाळला. इंग्लंडला २०० धावांचा टप्पाही ओलांडताना नाकेनऊ आले. बेन स्टॉक्सने नाबाद ८२ धावांची संयमित फलंदाजी करत संघाला विजयाजवळ नेले. मात्र, इंग्लंडला विजय मिळवून देण्यात त्याला यश आले नाही. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगा याने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचे ४ गडी टिपले. तर धनंजय डी सिल्व्हाने ३, इसुरू उडानाने २, तर नुवान प्रदीपने १ गडी बाद केला.

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या श्रीलंकेचा निर्णय फळाला आला नाही. श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर दिमुथ करुणारत्ने आणि कुसल परेरा संघाची धावसंख्या ३ वर असताना माघारी फिरले. यानंतर मैदानात उतरलेल्या अविष्का फर्नांडो आणि कुशल मेन्डिस यांनी संयमित फलंदाजी करत श्रीलंकेच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. अविष्का फर्नांडोचे अर्थशतक अवघ्या एका धावाने हुकले. त्याने ३९ चेंडूत ४९ धावा केल्या. अँजेलो मॅथ्यूजने कुसल मेन्डिसच्या साथीने भागिदारी करण्याचा प्रयत्न केला. कुशल मेन्डिस ४६ धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या जीवन मेन्डिस खातेही न उघडता बाद झाला. एका बाजूने अँजेलोने जम बसवत अर्थशतक पूर्ण केले. पण, दुसऱ्या बाजूने त्याला अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही. श्रीलंकेचे बाकीचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत राहिले. अँजलो मॅथ्यूजने ८५ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीत ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. निर्धारित ५० षटकांत श्रीलंकेने ९ गड्यांच्या मोबदल्यात २३२ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर व मार्क वूड यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर आदिल रशीदने २, तर ख्रिस वोक्सने १ गडी बाद टिपला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!