स्तनदा आणि गरोदर मातांना लोकलमध्ये राखीव जागा; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची मागणी

स्तनदा माता आणि गर्भवती महिलांना प्रत्येक लोकलच्या डब्यात दोन जागा राखीव ठेवण्याची मागणी महाराष्ट्र महिला आयोगाकडून करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे तसं निवेदन देण्यात आलं आहे.कामाच्या वेळी आणि इतरही वेळी प्रवास करणाऱ्या महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यात एखादी महिला गरोदर असल्यास किंवा ती स्तनदा माता असल्यास आणखी अडचणी येतात. स्तनपान करणाऱ्या महिलेला बाळाला दूध पाजण्यासाठी लोकल प्रवासात अनेकदा जागा मिळत नाही. त्यामुळे, रेल्वे मंत्र्यांकडे राखीव जागांसाठी मागणीचं निवेदन देण्यात आलं असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितलं.
ट्रेनमध्ये सकाळ आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. यातून प्रवास करणे गैरसोयीचे असते. गर्भवती तसेच स्तनदा मातांना प्रवास सुरक्षित होण्यासाठी दोन जागा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्रव्यवहार करून करण्यात आली आहे.