वायू दलाच्या बेपत्ता विमानाचा शोध , पायलटसह १३ जणांचा मृत्यू

भारतीय हवाई दलाचे मालवाहतूक विमान सोमवारी दुपारी बेपत्ता झाले होते. मात्र, हे विमान कोसळून, त्यातील 8 कर्मचारी व 5 प्रवासी असे एकूण 13 जण जागीच मृत पावल्याचे वृत्त आहे. तर, हे विमान शोधण्यात हवाई दलाला यश आले असून त्यातील 29 वर्षीय पायलट आशीष तंवर यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे. तंवर हे हरियाणातील पलवल येथील रहिवासी होते. ते त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक पुत्र होते. आशिष यांच्या पत्नी सुद्धा हवाई दलात रडार ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत.
चीनच्या सीमेजळील आसामच्या जोरहाट येथून सोमवारी (3 जून) अरूणाचलकडे उड्डाण केलेले हवाई दलाचे विमान बेपत्ता झाले होते. हे विमान शोधण्यासाठी हवाई दलाने सुखोई-30 आणि सी-130 या विमानांची मोहिम सुरू केली होती. या विशेष शोध मोहीमेला मंगळवारी विमानाचे अवशेष शोधण्यात यश आले आहे. हवाई दलाच्या या विमानाचे पायलट आशिष तंवर यांना विरमरण आल्याचे हवाई दलाने जाहीर केले. या विमानाचे अवशेष पायुम नावाच्या गावापाशी दिसल्याचे सांगण्यात आले आहे.
विमान बेपत्ता झाल्याचे समजल्यापासून नवे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सतत हवाई दलाच्या संपर्कात होते. हे विमान आसामहून अरुणाचल प्रदेशकडे निघाले होते. हे रशियन बनावटीचे अँटोनोव एएन-32 जातीचे विमान असून, यापूर्वीही अशा विमानांना अपघात झाले आहेत. या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटताच हवाई दलाने विमानाचा शोध सर्वत्र सुरू केला होता. या कामात लष्कराचे जवान व इंडो-तिबेट बॉर्डर फोर्सचे पोलीसही मदत करीत होते. त्यानंतर संध्याकाळी हे विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले. या विमानातील कर्मचारी व प्रवासी अशी एकूण 13 जणांची नावे समोर आली आहेत.