नीरव मोदीचा जामिनासाठी अर्ज; ११ जूनला सुनावणी

पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या कोठडीत २७ जूनपर्यंत वाढ झाल्यानंतर मोदीने लंडन हायकोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, त्यावर ११ जून रोजी सुनावणी होणार आहे. हजारो कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी नीरव मोदी भारताला हवा असून, त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी ब्रिटनकडे करण्यात आली आहे. नीरव मोदीला गुरुवारी वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट्स कोर्टामध्ये गुरुवारी हजर करण्यात आले, त्या वेळी मुख्य न्यायाधीश इमा अर्बुथनॉट यांनी नीरव मोदीला २७ जूनपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली. यानंतर नीरव मोदीने या शिक्षेविरोधात जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर ११ जून रोजी सुनावणी होणार असल्याचे वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट्स कोर्टाने सांगितले.
४८ वर्षीय मोदीविरोधात कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. यापूर्वीही मोदीचा तीन वेळा जामीनअर्ज फेटाळण्यात आला आहे. आतापर्यंत नीरव याने तीन वेळा जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला आहे. नीरव मोदी याने केलेला गैरव्यवहार आणि त्याची व्याप्ती पाहता त्याला जामिनावर सोडता येणार नसल्याचे मत लंडनमधील कोर्टाने नोंदवले होते. तसेच त्याचे हस्तांतर केल्यास भारतातील कोणत्या तुरुंगात त्याला ठेवले जाणार आहे याची माहिती १४ दिवसांत देण्याचे आदेशही कोर्टाने भारताला दिले आहेत. भारताच्या वतीने लंडनच्या क्राउन प्रोस्यूक्युशन सव्ह्रिस (सीपीसी) ने बाजू मांडली.