Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डोनाल्ड ट्रम्प सोबतची बैठक निष्फळ ठरल्यामुळे किम जोंग उनने राजदुतासह पाच जणांना दिली मृत्यूदंडाची शिक्षा !!

Spread the love

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने राजदुतासह पाच जणांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात बैठक झाली होती. पण यात कोणताही तोडगा निघाला नाही. म्हणून या बैठकीचं नियोजन करणाऱ्या राजदुतासह इतर चार अधिकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

दक्षिण कोरियातील एका वृत्तपत्रात याबाबत माहिती देण्यात आली आहे. हयोक चोल यांना अमेरिकेसोबत संबंध सुधारण्यासाठी विशेष राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. हनोईच्या बैठकीची रुपरेषा ठरवण्याची जबाबदारीही चोल यांच्याकडेच होती. शिवाय किम जोंगसोबत चोल हे हनोईला विशेष ट्रेनने गेले होते.

या वृत्तानुसार, किम जोंगसोबत विश्वासघात केल्याचा ठपका ठेवत मृत्यूदंडाची शिक्षा म्हणून या पाच जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. चोसुन इबो या वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तपासानंतर चोल यांना मार्च मार्चमध्ये मीरिम विमानतळावर परराष्ट्र मंत्रालयाच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गोळ्या घालण्यात आल्या. या चार अधिकाऱ्यांचं नाव गुप्त ठेवण्यात आलंय. फेब्रुवारीमध्ये झालेल्या हनोई समिटवेळी चोल यांनी अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीफन बिगन यांच्यासोबत काम केलं होतं.

उत्तर कोरियामध्ये किम जोंग उनची हुकूमशाही आहे. या देशात याअगोदरही अनेक वरिष्ठ नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचं बोललं जातं. या देशात नागरिकांचे मुलभूत अधिकार जवळपास नसल्यात जमा आहे. उत्तर कोरियाच्या अणुबॉम्ब चाचणीनंतर अमेरिकेसोबतचे संबंध प्रचंड बिघडले होते. यावर तोडगा काढण्यासाठी २०१८ मध्ये सिंगापूरमध्ये, तर फेब्रुवारी २०१९ ला हनोईमध्ये बैठक झाली. पण कोणताही तोडगा निघाला नाही.

या वृत्तातील आणखी एका दाव्याप्रमाणे, समिटमध्ये एक छोटीशी चूक झाल्यामुळे किम जोंग उनची महिला इंटरप्रेटर शिन हे यांग यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. ट्रम्प यांनी नो डील ही घोषणा केली तेव्हा शिन यांना किमचा नवा प्रस्ताव ट्रान्सलेट करता आला नव्हता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!