मुंबई-पुणे हायवेवर बस धडकल्या; २ ठार, २० जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळ आज सकाळी मिनी बस आणि लक्झरी बसमध्ये धडक झाली. या भीषण अपघातात २ जण ठार झाले, तर २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृत व्यक्ती हे वसईचे राहणारे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, खालापूरजवळ आज सकाळी पावणे आठ ते आठ वाजताच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त मिनी बस महाबळेश्वरकडे जात होती. येथील बोगद्याजवळ मिनी बस लक्झरी बसवर आदळली. या अपघातात वसईचे रहिवासी जोसेफ सरेजा आणि बसचालक शेखर कांबळे हे दोघे ठार झाले. तर २०हून अधिक जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी वसईचे होते. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.