सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचे नवे धोरण लागू; सरकारवर टीका, रिल्स आणि गोपनीय कागदपत्रे शेअर करण्यास बंदी
महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन सोशल मीडिया नियम (Social Media Guidelines) लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार सरकारी धोरणे, राजकीय घडामोडी किंवा सरकारच्या निर्णयांवर सार्वजनिक टीका अथवा प्रतिकूल टिप्पणी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर करताना शासकीय गोपनीयता, शिस्त आणि नियमांचे पालन करणे सर्व कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
सरकारवर टीका टाळण्याचे निर्देश
नवीन नियमांनुसार, सरकारी कर्मचारी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया खात्यांवरून सरकारी धोरणे, राजकीय विषय किंवा शासनाच्या निर्णयांवर सार्वजनिक टीका किंवा प्रतिकूल टिप्पणी करू शकणार नाहीत. प्रशासनाची निष्पक्षता आणि सेवाशिस्त अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने हे निर्देश देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
रिल्स, फोटो आणि व्हिडिओंवर निर्बंध
शासकीय पदनाम, गणवेश (वर्दी), सरकारी वाहने, कार्यालये किंवा सरकारी इमारतींचा वापर करून रिल्स, फोटो किंवा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
द्वेषमूलक आणि आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई
आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानीकारक किंवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर, फोटो, व्हिडिओ किंवा संदेश शेअर, फॉरवर्ड किंवा अपलोड केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
गोपनीय कागदपत्रे शेअर करण्यास सक्त मनाई
सरकारची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही गोपनीय कागदपत्रे, अंतर्गत नोंदी किंवा शासकीय माहिती सोशल मीडियावर प्रसारित करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वयंप्रसिद्धीवरही निर्बंध
कार्यालयीन काम करताना स्वतःची प्रसिद्धी किंवा स्वयंप्रशंसा होईल अशा प्रकारचे पोस्ट, व्हिडिओ किंवा मजकूर सोशल मीडियावर टाकू नयेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना नियम लागू
ही नियमावली कायमस्वरूपी शासकीय कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, बाह्यस्रोतावरील कर्मचारी तसेच महामंडळांतील कर्मचाऱ्यांनाही लागू असेल.
व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामला अटींसह परवानगी
शासकीय योजना आणि जनजागृतीसाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शासनाने बंदी घातलेल्या कोणत्याही ॲपचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
नियमभंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई
महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर आणि शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. गंभीर प्रकरणांमध्ये निलंबनासह इतर प्रशासकीय कारवाईचाही सामना करावा लागू शकतो.
Greece : विमानाच्या खिडकीची काच फुटली अन् प्रवासी बाहेर खेचला गेला; सीटबेल्टने वाचवला जीव
