‘सिमी’ बंदीबाबत शुक्रवारी बेकायदेशीर कृत्ये, प्रतिबंधक न्यायाधिकरणासमोर सुनावणी

‘सिमी’ संघटनेच्या बंदीबाबत शुक्रवारी बेकायदेशीर कृत्ये, प्रतिबंधक न्यायाधिकरणासमोर सुनावणी होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर ही सुनावणी होणार आहे. ‘सिमी’ संघटनेच्या बंदीच्या अनुषंगाने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक), न्यायाधिकरणाचा दौरा १७ व १८ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. न्यायाधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मुक्ता गुप्ता गुरुवारी औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत.
या कालावधीत ‘सिमी’ संघटनेच्या बंदीबाबतच्या प्रकरणावर सुनावणी होणार असून तपासी अधिकाऱ्यांच्या साक्ष होणार आहे. ॲडिशनल सॉलीसिटर जनरल पिंकी आनंद आणि वरिष्ठ वकील विशेष सरकारी समुपदेशक सचिन दत्ता हे देखील न्यायाधिकरणासोबत दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे शुक्रवार व शनिवारी बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) न्यायाधिकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मुक्ता गुप्ता यांच्या समक्ष होणार आहे. सुनावणीचे कामकाज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या कोर्ट हॉल क्रमांक ९ येथे सकाळी दहापासून सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.