MaharashtraPoliticalUpdate : सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १ हजार ८५१ कोटीच्या मदतीची घोषणा ..

नागपूर : विरोधकांच्या आरोपानंतर राज्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ हजार ८५१ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा सोमवारी विधानसभेत केली. मागील दीड वर्षांत शेतकऱ्यांना विविध विभाग व योजनांच्या माध्यमातून ४४ हजार कोटी रुपयांची मदत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. दुसरीकडे सरकारने केवळ आकड्यांचा खेळ केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.
सरकारच्या माहितीनुसार राज्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने ९ लाख ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरीत आंदोलन केले. तसेच सभागृहात देखील या विषयावर चर्चा घडवून आणण्यात आली होती. दरम्यान शेतकऱ्यांच्या या नुकसान भरपाईपोटी १ हजार ८५१ कोटी रुपये वितरित करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला विरोधकांनी आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची मागणी फेटाळल्याने विरोधी आमदारांनी सभात्याग करीत सरकारचा निषेध केला.
साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी
दरम्यान सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकरी प्रश्नावरकर्जमाफीचा प्रस्ताव दिला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, धानासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत १५ हजारांऐवजी २० हजार रुपये मदतीची घोषणा केली. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार असून साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.