IndiaPoliticalUpdate : निवडणुका झाल्या , निकाल आले आता मुख्यमंत्रीपदासाठी चुरस ….

नवी दिल्ली : देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता या राज्यांचा मुख्यमंत्री कोण बनणार यासाठी नाव निश्चिती केली जात आहे . यापैकी भाजपने जिंकलेल्या तीन राज्यात भाजपकडून विचार विनिमय केला जात असला तरी मिझोरामच्या मुख्यमंत्रीपदी झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम)चे लालदुहोमा यांची निवड निश्चित मानली जात आहे तर काँग्रेसकडून तेलंगणात रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
आता फक्त मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचे चित्र स्पष्ट नाही. या तिन्ही राज्यात भाजपने विजय मिळवला आहे. भाजपने या निवडणुकीत कुठेही मुख्यमंत्री चेहरा जाहीर केला नव्हता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार आहेत, हे भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान आहे.
अजूनही संभ्रम कायम आहे
मध्य प्रदेशात भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदार आहेत. कैलाश विजयवर्गीय यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि नरेंद्र सिंह तोमर ही नावेही शर्यतीत आहेत.
राजस्थानमध्येही पक्षाला हीच समस्या भेडसावत आहे. येथेही मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत अनेक नावे आहेत. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल, राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी, दिया कुमारी अशी नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, महंत बालकनाथ हेही मोठे दावेदार असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्यात वसुंधरा राजेंच्या बाजूने मोठे शिबिर उभे राहिले आहे.
छत्तीसगडचा मुख्यमंत्री कोण होणार ?
छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह, प्रदेश भाजप अध्यक्ष अरुण कुमार, विरोधी पक्षनेते धर्मलाल कौशिक आणि माजी आयएएस अधिकारी ओपी चौधरी यांची मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नावं घेतली जात आहेत. आता पक्षाला त्यापैकी एकाचे नाव फायनल करायचे आहे.
चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांमार्फत पाठवला राजीनामा
तेलंगणाचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय रात्री उशिरापर्यंत होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. सोमवारी हैदराबादमध्ये पक्षाच्या 64 आमदारांची बैठक झाली. त्यात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमारही सहभागी झाले होते.
तेलंगणात पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांनी अधिकाऱ्यांमार्फत राजीनामा पाठवला. यानंतर ते सीएम हाऊसमधून बाहेर पडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते मेडकला रवाना झाले. त्याचे फार्महाऊस येथे आहे.
तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांचे निकाल रविवारी आले. यामध्ये काँग्रेसने 64 जागा जिंकल्या. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला (BRS) 39 जागा मिळाल्या. 8 जागा भाजपला, 7 AIMIM आणि 1 जागा CPIच्या वाट्याला गेली. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी रविवारी रात्री राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला.