NCPNewsUpdate : शरद पवार यांचा व्हायरल ओबीसी दाखला, रोहित पवार यांची भाजपवर टीका …

मुंबई : सोशल मीडियावर गेल्या काही दिवासांपासून खासदार शरद पवार यांचा ओबीसी दाखला असल्याचा दावा करण्यात येत होता, पवारांचा दाखला व्हायरल झाल्याने खळब उडाली होती. दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी हा दाखला खोटा असल्याचा दावा केला असून आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर आरोप केला आहे.
यावर आपली प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार म्हणाले, भाजपची ती प्रथा आहे, भाजपला सत्य कधी समजत नाही. त्यांना खोट्या गोष्टी कळत असतात. भाजपचे जे पैसे घेऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत, टोल आर्मी आपण त्याला म्हणतो प्रत्येक कमेंटला तीन रुपये आणि प्रत्येक लाईकला दहा पैसे अशावर काम करणाऱ्या लोकांनी हा दाखला बदलून व्हायरल केला, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. भाजप हे सत्तेसाठी लढतंय, आम्ही सत्यसाठी लढतोय. सत्य आम्हाला माहित आहे. असत्याची बाजू घेऊन भाजपला सत्तेत यायच आहे. त्यामुळे लोकांच नुकसान झालं तरी त्यांना फरक पडत नाही. जसे भाजपचे नेते विचार करतात तसे कार्यकर्तेही विचार करतात कार्यकर्त्यांनी तो दाखला बदलून व्हायरल केल्याचे यात दिसत आहे, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.
दाखला खोटा असल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा
मराठा आरक्षणाचा तसेच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा तापलेला असतानाच रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘ओबीसी’ उल्लेख असलेला दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, हा दाखला खोटा असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. पुरावा म्हणून शरद पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला राष्ट्रवादीने समोर आणला असून या दाखल्यावर ‘मराठा’ असाच उल्लेख आहे. याबाबत खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, व्हायरल होत असलेला दाखला इंग्रजीत आहे. खोडसाळपणा करण्यासाठी असे प्रकार होत आहेत.
बावनकुळेंचे कानावर हात
दरम्यान आम्ही कशाला खोटी प्रमाणपत्रे व्हायरल करू, ती राष्ट्रवादीची परंपरा आहे, आम्ही राष्ट्रीय कामामध्ये गुंतलो आहोत, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.