MarathaReservationUpdaate : आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही , मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला भुजबळ यांचा तीव्र विरोध

मुंबई : ओबीसी आरक्षण अबाधित ठेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच मराठा समाज गरीब आहे, मात्र आरक्षण हे काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.
माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ५० टक्के आरक्षण आधीच दिले आहे. यात केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण EWS म्हाणून दिले आहे. यातच आता आणखी १० ते १२ टक्के आरक्षण वाढावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या. ही आमची मागणी आहे, असे म्हटले आहे. तसेच मराठा समाज यापूर्वी ओबीसी होता, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. यावर प्रश्न विचारला असता, ते खूप काय काय बोलतात, पण त्या सगळ्यावर बोलायला मी मोकळा नाही, अशी खोचक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून नाराजी
याआधीही छगन भुजबळ यांनी काही मुद्द्यांवर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नसून ओबीसीमधून सरसकट देण्यास आमचा विरोध आहे. मराठा समाजाला मागच्या दाराने आरक्षण देऊन ओबीसींवरती अन्याय होत असल्याची भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, राज्यभरात सुरू केलेल्या कार्यालयात या आणि कुणबी प्रमाणपत्र घेऊन जा, हे जे चाललेले आहे, ते चुकीचे आहे. खरोखर जे कुणबी आहेत, त्यांना आमचा विरोध नाही. पण जे चुकीच्या मार्गाने घुसत आहेत, त्यांना आमचा विरोध आहे. त्यांनी मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. कुणबी प्रमाणपत्र मिळाले तरी ओबीसीमध्ये दाखल होऊ शकत नाही, हा संभ्रम कसा तो आधी दूर करावा, ते आधी सांगावे, मग प्रश्न मिटेल, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली होती.