MarathaAndolanNewsUpddate : मनोज जरांगे पाटील यांचा तिसऱ्या टप्प्याचा दौरा जाहीर , समाजाला पैसे न देण्याचे आवाहन …

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपला तिसरा दौरा जाहीर केला आहे. १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा तिसरा टप्पा असेल. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून दौऱ्याचा शुभारंभ होईल. दरम्यान १ डिसेंबरपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये साखळी उपोषण सुरु होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या स्मारकापासून दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी कुणीही कुणाकडे पैसे मागू नयेत, किंवा कुणालाही पैसे देऊ नयेत असे आवाहन करताना तसे लक्षात आले तर कारवाई केली जाईल असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, समाजातील डॉक्टर, शिक्षक, व्यावसायिक, अधिकारी, राजकारणी, श्रीमंत, गरीब कुणीही दौऱ्याच्या नावाखाली कुणाला पैसे देऊ नयेत. हा गरीब मराठ्यांचा लढा आहे, तो मराठे लढत आहेत. लोक स्वखर्चाने दौऱ्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे देणाऱ्यांनीही पैसे देऊ नयेत. कारण त्यामुळे आंदोलनाला डाग लागण्याची शक्यता आहे.
आम्ही कुणालाही खर्च मागत नाही…
दरम्यान यापूर्वी झालेले दौरे आणि सभा याचा खर्च सुद्धा आम्ही कधीच कुणाला मागितलेला नाही. त्यामुळे इथून पुढेसुद्धा कुणी पैसे देऊ नयेत. कुणी म्हणेल, पाटील तसे म्हणत असतात.. त्यांना तसेच म्हणावे लागते. तरी ऐकू नका आणि पैसे देऊ नका. हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी असून पैसे कमावण्यासाठी नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
असा असेल दौरा …
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठी भेटी घेण्यासाठी आपण पुन्हा दौरा सुरू करीत असून १५ नोव्हेंबर पासून ते २३ नोव्हेंबर दौरे करणार हा दौरा असल्याचे सांगून त्यांनी या दौऱ्याच्या तारखा जाहीर केल्या.
१५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा
१६ नोव्हेंबर रोजी दौंड, मायणी
१७ नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड
१८ नोव्हेंबर रोजी सातारा, मेंढा, वाई, रायगड
१९ नोव्हेंबर रोजी रायगड, राडगड दर्शन, रायगड ते पाचाड दर्शन, मुळशी आंळदी
२० नोव्हेंबर रोजी तुळापुर, पुणे, खराडी, चंदननगर, आंळदी, खालापुर, कल्याण
२१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक त्र्यबंकेश्वर,
२२ नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संमगमनेर, श्रीरामपुर
२३ नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई त्यानंतर आंतरवली.
आपल्या दौऱ्याचा हा तिसरा टप्पा असून पुढच्या चौथ्या टप्प्यामध्ये आपण राहिलेला मराठवाडा, विदर्भ, कोकण असे ६ टप्प्यात दौरे करणार असल्याची माहिती यावेळी जरांगे यांनी दिली आहे. कोल्हापूर येथून शाहू महाराजांच्या स्मारकापासून या दौऱ्यांची सुरुवात करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटले आहे.