MumbaiNewsUpdate : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड , तिघे जण ताब्यात , जरांगे यांना अटक करण्याची मागणी …

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड काही अज्ञातांकडून करण्यात आली आहे.यासंदर्भात गुणरत्न सदावर्तेंनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अनेक गंभीर आरोप गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांच्यावर केले आहेत. तसेच, मनोज जरांगेंनी तातडीने अटक करावी, अशी मागणीही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. या तरुणांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून हे तरुण औरंगाबादचे असल्याचे सांगण्यात येत आहे. तोडफोडीमागे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची काही लोकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली. सदावर्तेंच्या परळ येथील घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं आहे. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे तिनही तरुण औरंगाबादचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावेळी आरोपींनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे ही सांगण्यात येत आहे.
सदावर्तेंच्या परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये असणाऱ्या घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच, मला वारंवार धमक्या येत आहेत, असा दावाही वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. हे दोघेही मुख्य याचिकाकर्ते होते. याच याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द झाले होते . यामुळे तेव्हापासूनच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मराठा समाजामध्ये रोष आहे. याचाच राग मनात ठेवून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी काही मराठा आरक्षण संघटनांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील घराबाहेर उपोषण केलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनी सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तब्बल तीन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
‘माझ्या मुलीला आणि पत्नीलाही जीवे मारण्याच्या धमक्या’
वाहनांच्या तोडफोडीनंतर “मनोज जरांगेंना तातडीने अटक करा. माझ्या मुलीला आणि पत्नीलाही जीवे मारण्याच्या धमक्या. हल्लेखोर माझ्याही घरी येणार होते. पोलिसांसमोर माझ्या वाहनांची तोडफोड” असा आरोप करीत गुणरत्न सदावर्ते यांनी “हीच आहे का शांततामय आंदोलनाची व्याख्या. मला कुणीही शांत करु शकत नाही. जरांगेंच्या शांततामय आंदोलनाची हीच आहे का व्याख्या?” असा सवाल गुणरत्ने सदावर्ते यांनी विचारला आहे.
पोलिसांनी याबाबत माहिती होती : गुणरत्न सदावर्ते
“माझी मुलगी झेन गेल्या आठ दिवसांपासून शाळेत जात नाही. कारण तिलाही मारण्याच्या आणि माझ्या पत्नीला उचलून नेण्यापर्यंत मला धमक्या येत आहेत. अशा प्रकारचे हल्ले, असा आघात होईल, आम्हाला त्रास दिला जाईल, फोन, व्हिडीओ रेकॉर्डिंग, सोशल मीडियावरच्या धमक्या आम्हाला दिल्या जात आहे.” , असंही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले .
“काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी माझ्यासमोरच पोलीस आयुक्तांना फोन केला होता. त्यानंतर एका कॅबिनेट मिनिस्टरनेही यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. याचाच अर्थ पोलिसांनाही याबाबत माहिती होते. आज ज्यांनी माझ्या गाडीची तोडफोड केली. ते इमारतीतील माझ्या घरी येण्याचाही प्रयत्न करत होते.”, असे सदावर्ते म्हणाले
मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा
“जरांगे तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र फडणवीसांनाही सांगतो, महाराष्ट्रात अशा अघटीत घटनांची श्रृंखला पोलिसांवरील हल्ल्यापासून झाली. ती आज माझ्या घरात येऊन ठेपली. मला हे सांगायचं आहे की, बस्स झालं, ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थी पडले, अशा या जरांगेला तातडीनं अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा अन्यथा सर्व गुणवंतांना वाटेल की, अशा प्रकारे जात म्हणून एकत्र आलं तर गुणवंता तोडमोड केली जाऊ शकते”, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
“मी थांबणार नाही, या क्षणानंतर मीसुद्धा राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये जाऊन खुल्या गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करेल आणि मी सरकारला सांगेल, एकट्या जरांगेचं ऐकायचं नाही, आमचंही ऐकायचं आणि जरांगेंचे लाड थांबवले नाही, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेल”, असंही सदावर्ते म्हणाले आहेत.
राज्यात सर्वत्र उद्रेक
दुसरीकडे, राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मराठा आरक्षणावरून राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक भागांत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. तसेच, आरक्षणासाठी आम्ही शांततेचं आंदोलन करत आहोत. कुणीही उग्र आंदोलन करू नका. जाळपोळ, तोडफोड करू नका, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील वारंवार करत आहेत.