MaharashtraPoliticalUpdate : शरद पवार , अजित पवारांच्या उद्या स्वतंत्र बैठका , फोटो न वापरण्याची अजित पवारांना ताकीद ..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. केवळ फूटच नाही तर अजित पवारांच्या बंडखोर गटाने राष्ट्रवादीवर दावाही केला आहे. अशा परिस्थितीत पक्षाला कसे वाचवायचे हे शरद पवारांसमोर आव्हान आहे. आता आणखी आमदार सरकारमध्ये सामील होतील, असा दावाही अजित पवारांच्या गटाकडून केला जात आहे. ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, मंगळवारी शरद पवार म्हणाले की, ज्यांनी त्यांच्या विचारसरणीचा ‘विश्वासघात’ केला त्यांनी त्यांचे चित्र वापरू नये.
शरद पवार म्हणाले, “ज्या पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे जयंत पाटील हे त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तोच पक्ष पक्षाचे चिन्ह वापरू शकतो.” शिवाय पक्षाचा प्रमुख म्हणून, कोणाचा फोटो वापरायचा हा अधिकारसुद्धा त्यांचाच आहे.
पवार पुढे म्हणाले की , “ज्यांनी माझ्या विचारसरणीचा विश्वासघात केला आणि ज्यांच्याशी माझे वैचारिक मतभेद आहेत ते माझा फोटो वापरू शकत नाहीत.” दरम्यान अजित पवार गटानेही जयंत पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. तर पाटील यांनी अजित पवार आणि त्यांच्या इतर आमदारांना सभागृहाच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
उद्या दोन्ही गटांची स्वतंत्र बैठक
शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांच्या उद्या बुधवारी स्वतंत्र बैठका होणार आहेत. शरद पवार यांनी यांनी आपल्या आमदारांची बैठक दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात तर अजित पवार यांनी त्यांच्या गटाची बैठक वांद्रे उपनगरातील भुजबळ नॉलेज सिटी येथे सकाळी ११ वाजता ठेवली आहे.