MaharshtraPoliticalUpdate : अंधेरी पोट निवडणूक : जोरदार शक्तिप्रदर्शन करीत लटके आणि पटेल यांचे अर्ज दाखल

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीकडून शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी तर भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने भाजपाने मुरजी पटेल यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पक्षचिन्ह मिळूनही उमेदवार उभा केला नाही. दरम्यान ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिल्याने काही काळ त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेने ऋतुजा लटके यांना कार्यमुक्त करताच अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज भरला.
दरम्यान शिवसेना नेते अनिल परब म्हणाले कि , अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके निवडून येतील. आम्ही त्यांना बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. मात्र, निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत आणि मोठ्या मताधिक्याने जिंकू. आपल्या दुसऱ्या उमेद्वाराबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की , “हा नियमच असतो. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांनी अर्ज केला. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे दोन उमेदवारांची नावे दिली जातात. पहिल्या उमेदवाराचा अर्ज काही कारणाने रद्द झाला, तर शिवसेनेच्या दुसऱ्या नावाला अधिकृत उमेदवार समजले जाते . म्हणून शिवसेनेने संदीप नाईक यांची उमेदवारी भरली आहे. परंतु उद्या ऋतुजा लटके यांचा अर्ज पडताळणीत अर्ज योग्य ठरेल, तेव्हा नाईक यांचा अर्ज ताबोडतोब मागे घेतला जाईल.”
अंधेरीची निवडणूक मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाची असून या निवडणुकीत आमचा उमेदवार विजयी होईल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे तर काँग्रेस नेते भाई जगताप , दिलीप वळसे पाटील यांनी महाविकास आघाडीचाच उमेदवार बहुमताने निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. या निमित्ताने आयोजित एका पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिवंगत आमदार रमेश लटके जिवंत असते तर शिंदे यांच्यासोबत आले असते असा दावा केला.