BJPNewsUpdate : निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : निवडणूक आयोगाने तातडीचा आदेश देत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव तूर्त गोठविल्याच्या वृत्तावर अनेक नेत्यांच्या उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘यापूर्वीही निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतरच अंतिम निर्णय दिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘केंद्रीय निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला आहे तो त्यांच्या कार्यपद्धतीला धरुनच दिला आहे. अंतिम निर्णयाच्या वेळी एकनाथ शिंदेंची बाजू वरचढ ठरेल अशी अपेक्षा आहे.’ दरम्यान, या निर्णयामागे भाजपचा हात असल्याच्या आरोपावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘शिवसेनेने नवीन नावे सांगितली आहेत, त्यामागे शरद पवार असल्याचे म्हटले जात आहे.’
दरम्यान या सगळ्यामागे भाजपा असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून आणि शिंदेगटाकडूनही शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेमध्ये मोदींविषयी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.
देशात मोदींचे नाणे चालत राहील ….
उद्धव ठाकरेंच्या विधानाविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली आहे. “बहुतेक उद्धव ठाकरे हे विसरलेत की नोटबंदीनंतरच्या सगळ्या निवडणुका ते मोदींच्या नाण्यावरच जिंकले आहेत. त्यांचे १८ खासदार आणि ५६ आमदार मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच श्रद्धेय राहतील, पण देशात मोदींचं नाणं चालतच राहील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर टिप्पणी…
उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरील संवादामध्ये ‘ही शेवटची निवडणूक असल्याप्रमाणे लढा’ असे आवाहन केल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मागच्या वेळी मी म्हटले होते की प्रत्येक निवडणूक शेवटची म्हणून लढा, तेव्हा त्यांना त्याचं फारच वाईट वाटलं होतं. त्यांनी माझीच शेवटची निवडणूक ठरवली होती. मी त्यावर काहीही प्रतिक्रिया देणार नाही. ज्याला जशी निवडणूक लढायची, तशी लढवा”!