MaharashtraPoliticalUpdate : ठरलं !! शिंदे -फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

नवी दिल्ली : शिंदे -फडणवीस यांनी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महिना होत आला तरी मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकले नाही. दरम्यान शिंदे गट आणि भाजप नेत्यांमध्ये या विषयावरील चर्चा आता पूर्ण झाली असून लवकरच मंत्रिमंडळाच्या स्थापनेचे संकेत आहेत.
भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ स्थापनेची तयारी आता पूर्ण झाली असून, दोन्हीही गटांमध्ये मंत्रिमंडळाच्या विभागणीबाबत पूर्ण सहमती झाली आहे. मंत्रिपद आणि खात्यांच्या वाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये फॉर्म्युला ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंत्र्यांच्या नावावरून दोन्ही पक्षांमध्ये आपसात कुठलेही वाद नाहीत.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केल्यानंतर ३० जून रोजी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी मुख्य मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपचे नवे सहकारी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात दोन लोकांचे मंत्रिमंडळ सरकार चालवत आहे.
दरम्यान भाजप नेते अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ वाटपात कुठलेही मतभेद होऊ नयेत यासाठी दोन्ही नेते (एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस) सातत्याने मुंबईहून दिल्लीला राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी धाव घेत होते. प्राप्त माहितीनुसार एकनाथ शिंदे गृह, वित्त आणि पीडब्ल्यूडी यांसारखी ‘मोठी’ खाती आपल्या बाजूने ठेवण्यावर ठाम असल्याची चर्चा होती, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले फडणवीस अनेक मलईदार खाती आपल्याकडे ठेवण्याचा विचार करत होते.