HingoliNewsUpdate : औंढा नागनाथ , रोजगार हमी कामाच्या गैरव्यवहारप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा.

औंढा नागनाथ/ प्रभाकर नांगरे : औंढा नागनाथ पंचायत समिती मध्ये तालुक्यातील रोजगार हमी योजनेत गॅबियन बंधाऱ्यांच्या नावाखाली बनावट मजुरांच्या खात्यावर २६ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून, औंढा पोलिस ठाण्यात पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी, अभियंता, सहायक लेखाधिकारी आणि इतर सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून कोणताही प्रस्ताव आणि कामांची मागणी नसताना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी परस्पर मान्यता दिली होती. गटविकास अधिकारी, अभियंता, सहायक लेखाधिकारी कंत्राटी कर्मचारी आदींनी संगनमत करून बनावट मजुरांच्या खात्याद्वारे तब्बल २६ लाख रुपये उचलण्यात आले होते. या गैरव्यवहाराला गोजेगाव ग्रामपंचायतीने वाचा फोडली होती. जिल्हा परिषदेने या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी पथक नेमले होते.
तत्कालीन बीडीओसह इतर आठ जणांचा समावेश.
दरम्यान, चौकशी पथकाच्या चौकशीअंती औंढा नागनाथ पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी जगदीश साहू, सहायक लेखाधिकारी एल. के. कुरुडे, शाखा अभियंता सय्यद सलीम यांच्यासह कंत्राटी कर्मचारी सहायक कार्यक्रम अधिकारी गजानन कल्याणकर, तांत्रिक अधिकारी राहुल सूर्यवंशी, तांत्रिक अधिकारी सुयोग जावळे, डेटा एंट्री ऑपरेटर देवराव कंठाळे, विनोद गायकवाड आणि विनोद घोडके हे नऊ जण दोषी आढळले होते. बुधवारी दुपारी वरील नऊ जणांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सर्व संशयित आरोपींचा पोलिस तपास करत आहेत.