IndiaNewsUpdate : देशातील “इस्लामोफोबिया”च्या वाढत्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावे : शशी थरूर

नवी दिल्ली : भाजप नेत्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशात निर्माण झालेली स्फोटक परिस्थिती लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले पाहिजे, असे लोकसभा खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे.
या वादावर बोलताना थरूर म्हणाले की, भारत सरकारने अलिकडच्या वर्षांत इस्लामिक देशांशी संबंध मजबूत करण्यासाठी प्रभावी पावले उचलली असतील, परंतु आता प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे हे संबंध कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “इस्लामोफोबिया”च्या वाढत्या घटनांवर मौन सोडले पाहिजे.
शशी थरूर यांनी ‘पीटीआय-भाषा’ला दिलेल्या मुलाखतीत पुढे म्हटले आहे कि , प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक इस्लामिक देशांची नाराजी समोर आली आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही, मात्र त्यांना आता याची दखल घ्यायला हवी . मला वाटत की, पंतप्रधान मोदींनी आपल्या देशातील द्वेषयुक्त भाषण आणि “इस्लामोफोबिक” घटनांवर मौन सोडण्याची हीच योग्य वेळ आहे.
“कोणत्याही राष्ट्राच्या प्रगती आणि विकासासाठी सामाजिक एकता आणि राष्ट्रीय सद्भावना आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’च्या नावाखाली अशा घटना थांबवण्यासाठी आवाहन केले पाहिजे. परराष्ट्र धोरणाच्या प्रभावावर थरूर म्हणाले की, विडंबना अशी आहे की, अलिकडच्या वर्षांत भारत सरकारने इस्लामिक देशांशी, विशेषत: आखाती देशांशी संबंध मजबूत करण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. पण अशा घटनांमुळे ते संबंध कमकुवत होतील.
सरकारला आधीच सावध केले होते : चिदंबरम
इस्लामी देशातील ईशनिंदा कायद्यांबाबत थरूर म्हणाले की, इतर देशांतील अशा कायद्यांचा इतिहास त्यांच्या गैरवापराने भरलेला असल्याने मी अशा कायद्यांचे कौतुक किंवा त्यांचे समर्थनही करत नाहीत. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनीही या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींनी मौन सोडले पाहिजे, असे म्हटले आहे. पी चिदंबरम म्हणाले की, पंतप्रधानांचे मौन धक्कादायक आहे, विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, लेखक यांनी “इस्लामोफोबिया” संपवण्यासाठी सरकारला सावध केले होते, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले गेले, हे दुःखद आहे.