Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : पंतप्रधान देहूत दाखल , मुंबईतही कार्यक्रम

Spread the love

पुणे  : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीक्षेत्र देहू येथे दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन झाले त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख तसेच इतर नेते उपस्थित होते. आषाढी वारीसाठी सोमवारी तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

यावेळी पंतप्रधान संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करतील. २० मिनिटांच्या या लोकार्पण सोहळ्यानंतर ते सभेला संबोधित करणार आहेत. येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मंगळवारी मुंबई भेटीत पंतप्रधान दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान हे मुंबईत दाखल होतील. दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ‘मुंबई समाचार’ या गुजराती दैनिकाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला मोदी हे उपस्थित राहतील. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!