RajyasabhaElectionUpdate : राज्यसभेसाठीचे मतदान संपले आता प्रतीक्षा निकालाची…मुख्यमंत्र्यांनी दिली “हि” प्रतिक्रिया ….

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. एकूण २८५ आमदारांनी या मतदान प्रक्रियेत भाग घेतला . दरम्यान मतदानाची प्रक्रिया संपली असली तरी मतमोजणीसाठी विलंब होणार असल्याचे सांगितले जात आहे. दुपारी ४ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. पण त्यास आता विलंब होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची परवानगी घ्यावी लागते असा नियम आहे. दरम्यान भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपला आक्षेप नोंदवल्यामुळे मतमोजणीसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान भाजपाने राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर तसेच सुहास कांदे यांनी नियमबाह्य मतदान केल्याचा आक्षेप घेतला आहे. त्यासंदर्भातील सविस्तर पत्र देखील निवडणूक अधिकाऱ्यांना भाजपा आमदारांनी दिले आहे. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी नियमांचे उल्लंघन करुन मतदान केले आहे. त्यामुळे त्यांची मते बाद करण्याची मागणी भाजपाने केली आहे. तर दुसरीकडे भाजपा नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही नियमबाह्य मतदान केल्याचा आक्षेप महाविकास आघाडीकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे जोवर केंद्रीय निवडणूक आयोग यावर निर्णय देत नाही तोपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही असे वृत्त आहे.
BJP has raised objections on three votes of MVA- Yashomati Thakur of INC, Jitendra Awhad of NCP and Suhas Kande of Shiv Sena. BJP has requested the Returning Officer to hold their votes invalid: BJP's Parag Alawani, polling agent for party leader Piyush Goyal, on Rajya Sabha poll pic.twitter.com/pkBXBNnFQG
— ANI (@ANI) June 10, 2022
हि तक्रार करताना भाजप नेत्यांनी २०१७ च्या राज्यसभा निवडणुकीचा आधार दिला असून या नियमानुसार संबंधित आमदारांनी राज्यसभा निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन केले असून त्यांची मते अवैध ठरवावी, अशी मागणी भाजपा नेते पराग अळवणी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे पण निवडणूक अधिकाऱ्यांनी पराग अळवणी यांची ही मागणी फेटाळून लावत आतापर्यंत झालेले सर्व मतदान वैध पद्धतीने झाल्याचेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले, परंतु भाजपनेत्यांनी याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपला आक्षेप नोंदवला आहे त्यामुळे निकाल थांबला आहे.
भाजपचा आक्षेप काय होता ?
काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मतदान झाल्यानंतर मतपत्रिका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिली. तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील मतदान केल्यानंतर जयंत पाटलांकडे मतपत्रिका दिली. असाच प्रकार शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्याकडूनही झाला.
सर्वांचेच आक्षेप फेटाळले
भाजप नेत्यांच्या आक्षेपानुसार मतदान करताना प्रत्येक पक्षाच्या आमदाराने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीला एका अंतरावरुन मतपत्रिका दाखवायची असते, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका एजंटच्या हातात दिली. स्वतःच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवायची असते मात्र कांदे यांनी स्वतःच्या पक्षाबरोबर इतर पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधीला दिसेल अशी मतपत्रिका दाखवली, या कृतीमुळे हे मत बाद होते , असेही भाजपाचे म्हणणे होते, परंतु आतापर्यंत झालेली सर्व मते वैध असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांने सांगत सर्वांचे आक्षेप फेटाळून लावले.
राज्यसभा निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते . २८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये भाजपा १०६, शिवसेना ५५, काँग्रेस ४४, राष्ट्रवादी ५३ (यापैकी नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन आमदार सध्या तुरुंगात आहेत) आणि अपक्ष व इतर छोट्या पक्षांचे मिळून २९ आमदार आहेत. प्रत्येक उमेदवाराला राज्यसभेवर जाण्यासाठी ४२ पसंतीच्या मतांची आवश्यकता आहे. सामान्यपणे या निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रघात असताना यंदा २४ वर्षांनंतर महाराष्ट्रात राजकीय सहमती न झाल्यामुळे निवडणूक होत आहे.
मुख्यमंत्र्यांना विजयाची पूर्ण खात्री …
मतदानादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधिमंडळात ठाण मांडून होते. संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान मतदान पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यसभेत महाविकास आघाडी ४ जागा जिंकणार का? गुलाल उधळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर ‘Of course आम्ही गुलाल उधळणार’, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना खोदून खोदून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु संध्याकाळपर्यंत शासकीय निवासस्थानाहून परत विधिमंडळात येतो. मग तुमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण जाताजाता त्यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
भाजपच्या मतेही चमत्कार घडणार …
राज्यसभेच्या सहा जागांपैकी पाच जागांचे चित्र स्पष्ट असले तरी सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चांगलीच चुरस आहे. सहाव्या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात सामना होत आहे. दरम्यान संजय राऊतांनंतर पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची आवश्यक मते संजय पवार यांना मिळाल्याने ते विजयी होतील, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत. तर “मतदान संपले आहे , जो काही चमत्कार होणार आहे ते निकालात दिसेल”, अशी प्रतिक्रिया भाजपकडून व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेचीही निवडणूक आयोगाकडे तक्रार
भाजपने महाविकास आघाडीच्या तीन मतांवर घेतलेल्या आक्षेपानंतर आता शिवसेनाही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. सेनेने भाजपच्या रवी राणा आणि सुधीर मुंनगटीवार यांच्यावर आक्षेप घेतला असून त्यासंबंधी पत्र पाठवण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाना व्हिडीओ फुटेज मागवले
राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेल्या अहवालावर केंद्रिय निवडणुक आयोगाचा अद्याप निर्णय नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणी रोखून ठेवली असून तपासासाठी मतदान केंद्रावरील चित्रीकरण मागवले. चित्रीकरण तपासूनच केंद्रीय निवडणूक आयोग तीन मताबाबत निर्णय जाहीर करणार आहे.