RajThackerayNewsUpdate : राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम , “बेगडी धर्मनिरपेक्षतावादी” शरद पवार यांना पुनः डिवचले !!

मुंबई : काहीही झाले तरी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठीचा ‘आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच. आता नाही, तर कधीच नाही’ असे म्हणत राज ठाकरे यांनी माघार घेण्यास नकार दिला असून याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. यासंदर्भात त्यांनी देशवासीयांच्या नावाने एक पत्रकच प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल झाला आहे. तर त्यांच्या भूमिकेवरून पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. तरीही राज ठाकरेंनी पत्रक प्रसिद्ध करून आपल्या भूमिकेवर ठाम अस्लयची भूमिका जाहीर केली आहे.
सर्वांना आवाहन pic.twitter.com/SNgxd2GMTA
— Raj Thackeray (@RajThackeray) May 3, 2022
बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार..
या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून, “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी “सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेले आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
या निमित्ताने त्यांनी पुनः एकदा शरद पवार यांना डिवचले आहे. आपल्या तीन पानांच्या पत्रकात त्यांनी जिथे मशिदीवर भोंगे वाजविले जातील, तिथे हनुमान चालिसा वाजवा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढणार असल्याचे चित्र आहे.
अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही…
औरंगाबाद पोलिसांनी तुमच्या विरुद्ध गुन्हा दखल केला आहे याविषयी विचारले असता , मला पोलिसांकडून अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही. पोलिसांकडून नोटीस आल्यावर पुढे काय करायचं ते ठरवेन. ती माहिती पोलीस आणि माध्यमांनादेखील दिली जाईल, असे राज ठाकरेंनी सांगितल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे. मला कोणतीही नोटीस आलेली नाही. त्यामुळे मी औरंगाबादमध्ये पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याच्या वृत्तात तथ्य नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
कार्यकर्त्यांना सूचना
३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा, ४ मेपासून ऐकणार नाही, असा आक्रमक पवित्रा राज ठाकरेंनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी राज यांनी पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
१. आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहून करा.
२. जिथे अनधिकृत भोंग्यांच्या माध्यमातून अजान होते, तिथे हनुमान चालिसा लावा
३. मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्यासाठी रितसर परवानगी मागा
४. अनधिकृत अजान सुरू झाल्यास पोलिसांकडे तक्रार करा
५. अनधिकृत भोंग्यांबद्दल पोलिसात लेखी तक्रारी करा
६. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन होत असेल तर आंदोलन करा.