MaharashtraPoliticalUpdate : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा…

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात १० मार्च नंतर फेरबदल होणार असल्याचे सूचित करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळातील फेर बदलावर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा होईल असे सांगितले होते त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा फोन आल्याची माहिती वृत्त वाहिन्यांनी दिली आहे.
दरम्यान काल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी निधी वाटपात इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींसोबत अन्याय होतो, त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. हि बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींच्या निधी वाटपाच्या प्रक्रियेत आता आपण स्वत: लक्ष घालणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला दिल्याचे पटोले यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आणि राज्याच्या राजकारणावर सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोनवर बातचित झाल्याचे वृत्त आहे. महाविकास आघाडी सरकार हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे आहे. त्यामुळे या सरकारमध्ये काँग्रेसची भूमिका देखील महत्त्वाची आहे. पण काँग्रेस मंत्र्यांना जर विकासकामांसाठी निधी मिळत नसेल तर हे गंभीर असल्याची भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे.
दरम्यान , काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतंच मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचे वक्तव्य केले होते. येत्या १० मार्चनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत त्यांनी दिले होते. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे म्हटल्याने काँग्रेस अंतर्गत संवाद आहे कि नाही याची चर्चा सुरु झाली आहे. याच्या आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी राज्यभरात जिल्हा पातळीवर काँग्रेसच्या कार्याध्यक्षांची नियुक्ती केली होती. पण त्या नियुक्तीवर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आक्षेप घेतला आहे. नाना पटोलेंच्या त्या निर्णयाला पक्षश्रेष्ठींनी स्थगिती दिली. त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या सर्व जिल्हा कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या. हायकमांडच्या आदेशानंतर नाना पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवले. नियुक्त कार्याध्यक्षांना जिल्ह्यात उपाध्यक्ष म्हणून संबोधले जावे, असे नाना पटोले यांनी पत्रकात म्हटले आहे.