IndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री ९.४५ ला अचानक येऊन केल्या या मोठ्या घोषणा …

नवी दिल्ली : नेहमीप्रमाणे केवळ १५ मिनिटे आधी ते देशाला उद्देशून बोलणार असल्याचे त्यांच्या आवडत्या सोशल मीडियावर घोषित करण्यात आले तेंव्हा ते काय बोलणार ? याचा विचारही लोकांना करू न देता ते घोषित केल्या प्रमाणे बरोबर रात्री ९.४५ वाजता लाइव्ह आले आणि त्यांनी देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी येत्या ३ जानेवारीपासून देशात लहान मुलांच्या लसीकरणाचे नवे पर्व सुरू होत असल्याचे घोषणा केली.
आपल्या भाषणात मोदी म्हणाले कि , ओमायक्रोनचा व्हेरिएंटचा धोका असला तरी घाबरण्याचे कारण नाही. सतर्कता बाळगा आणि कोविड नियम कटाक्षाने पाळा. दरम्यान देशातील लसीकरणाचा धावता तपशील देत असताना त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या तीन मोठ्या निर्णयांची घोषणा केली.
या घोषणांची माहिती देताना ते म्हणाले कि ,
१. कोरोना महामारीत लहान मुलांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यादिशेने आम्ही मोठे पाऊल टाकत आहोत. नवीन वर्षात पहिल्या सोमवारी अर्थात ३ जानेवारीपासून आम्ही १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करत आहोत.
२. कोविड योद्धे, हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांनी करोनाविरुद्धच्या लढाईत देशाला सुरक्षित ठेवण्यात मोठे योगदान दिले आहे. आजही ते कोविड रुग्णांना सेवा देत आहे. अशा कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षित करणे आवश्यक असून हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सना १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येईल.
३. साठ वर्षांवरील सहव्याधीग्रस्त नागरिकांना असलेला धोका लक्षात घेता त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तिसरा डोस देण्यात येणार आहे. त्याची सुरुवातही १० जानेवारीपासूनच केली जाईल.
स्वयंशिस्त आणि लसीकरण हीच प्रमुख शस्त्रे आहेत
आपल्या संबोधनात मोदी पुढे म्हणाले कि , भारतात ओमायक्रोनचा शिरकाव झाला असला तरी कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. आपल्याला अधिक सतर्कता बाळगावी लागेल. कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल हे मात्र ध्यानात ठेवा. दिशानिर्देशांबाबत स्वयंशिस्त आणि लसीकरण हीच कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रमुख शस्त्रे आहेत, हे आजवरच्या अनुभवातून सिद्ध झाले आहेत. त्यामुळे कोणतीही ढिलाई नको, अशी विनंती पंतप्रधानांनी केली.
एकत्रित प्रयत्न आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे लसीकरणाला अभूतपूर्व यश मिळाले असल्याचे सांगून ते म्हणाले कि , देशात १६ जानेवारी रोजी लसीकरण सुरू करण्यात आले आणि आतापर्यंत १४१ कोटी डोस दिले गेले आहेत. भारतातील ६१ टक्केपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर ९० टक्के नागरिकांना लसचा किमान एक डोस मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांना लसीकरणाचे डोस देण्याबरोबरच डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वरकर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सात डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती. याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
My address to the nation. https://t.co/dBQKvHXPtv
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2021