AurangabadCrimeUpdate : धक्कादायक : दोन वर्षीय चिमुकलीला कपाटात कोंडून ठेवणाऱ्यास नागरिकांनी दिला चोप

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या औषधी भवन परिसरात दोन वर्षांच्या चिमुकलीचा अपहरण करून तिला घरातील कपाटात कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांनीच मुलीची सुटका करून संशयित आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांना नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार , शहरातील औषधी भवन परिसरात भाड्याने राहण्यासाठी आलेल्या संशयित भाडेकरूने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी याच परिसरात रहाणाऱ्या एका कुटुंबातील दोन वर्षांची मुलगी अचानकपणे गायब झाली. मुलगी घरात, अंगणात आणि परिसरात शोधूनही मिळत नसल्याने मुलीच्या आई-वडिलांची चिंता वाढली. दरम्यान काही नागरिकांना एका घरातून लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. म्हणून घरात जाऊन पाहणी केली असता हरवलेली मुलीला एका कपाटात कोंडून ठेवण्यात आल्याचे धक्कादायक दृश्य दिसले. हे घर संशयित भाडेकरूची होते. हा सर्व प्रकार पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित भाडेकरूला शोधून चांगलाच चोप दिला. दरम्यान पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली असून अपहृत मुलीची सुटका केली आहे.