MaharashtraNewsUpdate : ‘म्युकोरमायकोसिस’ फंगल इन्फेक्शनमुळे 8 कोरोनामुक्त लोकांचा मृत्यू

मुंबई : राज्यात एकीकडे नवे कोरोना रुग्ण कमी व्हावेत आणि जास्तीत जास्त कोरोना रुग्ण बरे व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत पण आता कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनीही चिंता वाढवली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना जीवघेणे इन्फेक्शन होत आहे. ‘म्युकोरमायकोसिस’ या फंगल इन्फेक्शनमुळे राज्यात कमीत कमी 8 कोरोनामुक्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरसनंतर म्युकोरमायकोसिसचे नवे संकट उभे राहिले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अशा रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे. राज्यात आतापर्यंत अशा 200 रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. उपचारादरम्यान 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
‘म्युकोरमायकोसिस’ हे गंभीर असे इन्फेक्शन होत आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचत. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. सूरतमध्ये तब्बल 8 रुग्णांचे डोळे काढण्यात आले आहेत.
म्युकोरमायकोसिसची लक्षणे
तीव्र डोकेदुखी
अंगात सतत बारीक ताप असणे.
गालावर सूज किंवा बधिरपणा येणे.
नाक गळणे.
जबड्यातील हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणे.
वरच्या जबड्यातील दातांचे हलणे.
जबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणे .
वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे.
आजार टाळण्याचे उपाय
तोंडामध्ये आणि नाकातील पोकळ्याना सौम्य निर्जंतुकीकरण द्रावणाने धुणे.
मधुमेही रुग्णांना उपचारादरम्यान स्टेरॉइड आणि इतर इंजेक्शनचा नियंत्रित वापर करू नये.
रोगप्रतिकारशक्ती वर्धक बाबींचा आहारामध्ये समावेश करणे.
लक्षणं आढळल्यास लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आणि उपचार करणे.