WorldNewsUpdate : दुनिया : कर्ज बुडव्या निरव मोदीचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा

लंडन: भारताने केलेल्या मागणीवर ब्रिटन सरकारने सहमती दिली असून प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज बुडविणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिली. याआधी लंडन कोर्टानेदेखील नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी देत भारतातील तुरुंगात सर्व काळजी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून १४ हजार कोटींहून अधिक घोटाळा केला असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नीरव मोदीविरोधात सक्त वसुली संचालनालय आणि सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. त्याशिवाय इतरही काही गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. नीरव मोदीने आपल्या प्रत्यार्पणाला कोर्टात आव्हान दिले होते. जवळपास दोन वर्ष कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. भारतात सुरू असलेल्या खटल्यासाठी नीरव मोदीला भारतात हजर राहवे लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान फरार उद्योगपती नीरव मोदीला ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी १३ मार्च २०१९ रोजी अटक केली होती. त्यानंतर तो वँड्सवर्थ तुरुंगात आहे. नीरव मोदी व्हिडिओ लिंकद्वारे सुनावणीला हजर होता. जिल्हा कोर्टाचा हा निर्णय ब्रिटनच्या गृह सचिव प्रीति पटेल यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी नीरव मोदीला द्यायची की नाही, याचा निर्णय त्या घेतील. भारतात आणल्यानंतर नीरव मोदीला मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. ऑर्थर रोड तुरुंगात एक विशेष सेल तयार ठेवण्यात आला आहे. मोदीला बराक क्रमांक १२ मध्ये असलेल्या तीनपैकी एका सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. ऑर्थर रोड तुरुंगातील बराक क्रमांक १२ हा अतिसुरक्षित समजला जातो.