IndiaCoronaUpdate : आता 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना मिळणार लस

नवी दिल्ली | भारतात कोरोना लसीकरणाला वेग आला आहेत. आता 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लस मिळणार आहे. मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून हे लसीकरण सुरू केलं जाणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी पात्र असलेल्यांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
आतापर्यंत वयस्कर व्यक्ती आणि 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना इतर आजार होते त्यांनाच कोरोना लस दिली जात होती. पण आता आजार नसलेल्या व्यक्तींनाही कोरोना लस दिली जाणार आहे. लसीकरणाबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सरकारने 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
भारतात जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले . लसीकरणाचा आज 66 वा दिवस आहे. केंद्र सरकारने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात 4.8 कोटी (4,84,94,594) लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. त्यापैकी 78,59,579 आरोग्य कर्मचारी आणि 82,42,127 फ्रंटलाइन वर्कर्सना पहिला तर 49,59,964 आरोग्य कर्मचारी आणि 29,03,477 फ्रंटलाइन वर्कर्सना लशीचा दुसरा डोस मिळाला आहे. 45 ते 60 वयोगटातील इतर आजार असलेल्या 42,98,310 नागरिकांनी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन कोटींपेक्षा जास्त वयस्कर व्यक्तींनी लशीचा पहिला डोस घेतला आहे.