२९ जानेवारीपासू केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीने अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून करण्याची शिफारस केली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. अधिवेशन दोन टप्प्यात होईल. अधिवेशन काळात करोना व्हायरसशी संबंधित सर्व नियामांचे पालन केले जाणार आहे. संसद अधिवेशनाचा पहिला टप्पा २९ जानेवारीपासून सुरू होईल आणि १५ फेब्रुवारीपर्यंत चालेल. दुसऱ्या टप्प्यात ८ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान चालेल. सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाईल. २९ जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.
करोनामुळे यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवले गेले नाही. करोनाच्या वाढत्या घटनांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन यावेळी होणार नसल्याचे सरकारने म्हटले होते. दरम्यान सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी निशाणा साधला होता. शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवावे, अशी मागणी कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली होती.दरम्यान संसदेचे अधिवेशन बोलावू नये यावर सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चेनंतर एकमत झाले होते, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत अधीर रंजन चौ धरी यांना पत्र लिहून कळवले होते.
हिवाळी अधिवेशन रद्द केल्याने महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. केंद्राने हिवाळी अधिवेशन रद्द केले आहे. याचा तीव्र निषेध करतो. संसद अधिवेशन रद्द करणारे रशिया आणि भारत हे दोनच देश आहेत. लोकशाहीसाठी हे चांगलं लक्षण नाही. विधानसभा निवडणुका होऊ शकतात, राजकीय सभा होऊ शकतात तर हिवाळी अधिवेशनही बोलवायला हवं. ही हुकूमशाही आहे आणि इतर काही नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.