MaharashtraNewsUpdate : रात्रीच्या संचारबंदीबाबत गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

रात्रीची संचारबंदीबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्वाचा खुलासा केला असून त्यांनी म्हटले आहे कि ,खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लोकांच्या सुविधेसाठी व कोरोनाच्या संकटाला दूर ठेवण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले आहे.
देशमुख यांनी पुढे म्हटले आहे कि , राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. कोरोनाची तीव्रता कमी झालेली असली तर धोका मात्र टळलेला नाही. हे नागरिकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहेत. कोरोना योद्धा व जनतेच्या सहभागामुळे राज्याने खूप मोठ्या प्रमाणावर कोरोनावर मात केली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी कुठेही संधी मिळू नये, यासाठी या संचारबंदीचा फायदा होणार आहे. म्हणूनच राज्य सरकारने रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील नागरिकांच्या हितासाठी व आरोग्यासाठीच असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
संचारबंदीच्या काळात रात्रीच्या वेळी पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री सुरू राहणारी कार्यालये व प्रतिष्ठाने वगळता हॉटेल, पब, सिनेमागृहे रात्री ११ वाजता बंद करावी लागणार आहेत. या संचारबंदीतून वैद्यकीय सेवा तसेच अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्या आहेत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. संचारबंदी काळात मोटरसायकलवर एकटे किंवा दोघेजण प्रवास करू शकतील, चारचाकी वाहनेही चालविता येतील, परंतु या वाहनांमध्ये चारपेक्षा अधिक लोक राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. मॉर्निंग वॉक किंवा रात्री कामानिमित्त कुठे जायचे असल्यास त्यासाठी कोणतेही बंधन नसल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. करोना काळात सरकारला जनतेचे सकारात्मक सहकार्य मिळालेले आहे. या पुढील काळातही हे सहकार्य आम्हाला निश्चितपणे मिळेल, असा विश्वासही अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.