AnvayNaikSuicideCase : हायकोर्टाचा अर्णबला जामीन देण्यास सपशेल नकार , अलिबाग सत्र न्यायालयाकडे जाण्याचे निर्देश

अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज आज मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला. अर्णब यांच्यावतीने तातडीच्या सुटकेसाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, हा अर्ज फेटाळण्यात आल्याने अर्णब यांना जामीन मिळणार की नाही याचा फैसला आता अलिबाग सत्र न्यायालयातच होणार आहे. विशेष म्हणजे आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही फोन करून अर्णबच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती तर भाजपनेते रॅम कदम यांनी त्याच्या सुटकेसाठी सिद्धी विनायकाला साकडे घातले होते. शिवाय त्याच्या केसालाही धक्का लागला तर खबरदार असा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे.
अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात या दोघांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ४ नोव्हेंबरपासून अर्णब गोस्वामी अटकेत आहे. त्याला स्थानिक दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कोठडीला आव्हान देत अर्णब यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे जामीन अर्जावर सुनावणी झाली. शनिवारी खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता आणि आज निर्णय देत खंडपीठाने अर्णब यांचा अर्ज फेटाळून लावला.