WorldCoronaNewsUpdate : “या” दोन देशात दुसऱ्यांदा जाहीर केला जातो आहे एक महिन्याचा लॉकडाऊन !! ब्रिटनमध्ये तर दोन हजार सशस्त्र जवान तैनात

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तडाखा सहन केलेल्या अनेक युरोपीयन देशांसमोर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचेही आव्हान उभे राहिले असल्याचे या देशांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये उपाययोजना आखण्यास सुरुवात झाली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाला अटकाव करण्यासाठी एक नोव्हेंबरपासून लॉकडाउन जाहीर झाला आहे. तर ब्रिटन सरकारने गुरुवारपासून एक महिन्यांसाठी लॉकडाउन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार फ्रान्समध्ये कोरोनाचा फैलाव अतिशय वेगाने होत असून त्याबाबत कोणीही अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पॅरिस आणि इतर मोठ्या शहरांमध्ये काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत तरीही , कोरोनाची दुसरी लाट रोखण्यास अपयश आले असल्याचे फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी प्रामाणिकपणे सांगितले आहे. परंतु जगाच्या पाठीवर आपला भारत असा एक देश आहे ज्या देशात ८० लाखाहून अधिक लोक कोरोनाबाधित झाले आणि १२ लाखाहून अधिक लोक दगावले असले तरी देशातील राज्यकर्ते आपल्याकडे कोरोनाचे समूह संसर्ग झाला असे मानायला तयार नाहीत . मग देशातील इतके लोक काय विदेशातून कोरोना घेऊन आले आहेत ? या प्रश्नाचे उत्तर तसेही मिळणे कठीण आहे .
फ्रान्स पाठोपाठ ब्रिटननेही त्यांच्या देशात कोरोनाची दुसरी लाट अली असल्याचे सांगून त्याला तोंड देण्यासाठी तयारी सुरु केली आहे . आणि आम्ही तर यातच खुश आहोत कि आता आपला रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्केवारी पोहोचला आहे. प्रत्यक्षात चाचण्या किती होताहेत ? याची आकडेवारीच आता कोरोना कमी झाल्याचा भास देशात निर्माण केला जात आहे . दरम्यान कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येनंतर ब्रिटन सरकारने मात्र मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती दिली आहे. या निर्णयानुसार कोणत्याही ब्रिटिश नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे दिसत नसली तरी त्याची चाचणी होणार आहे.
कोरोनाबाधित लिव्हरपूल शहरात एक महिन्याचा लॉकडाऊन
या निर्णयाचा एक भाग म्हणजे कोरोनाबाधित लिव्हरपूल शहरात सर्वांची चाचणी घेण्याचा निर्णय हा प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला आहे. या प्रयोगात यश मिळाल्यास देशातील इतर ठिकाणीही सर्वांचीच चाचणी करण्यात येणार आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन ब्रिटन सरकारने गुरुवारपासून एक महिन्यांसाठी लॉकडाउन सुरू करण्याची घोषणा केली आहे. लिव्हरपूल शहरात चाचणी दरम्यान गोंधळ होऊ नये अथवा विरोध होऊ नये यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी सरकारने नवीन प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या सुरू असलेली स्वॅब चाचणी आणि न्यलॅट्रल फ्लोद्वारे लिव्हरपूलमधील नागरीक आणि कामगारांची चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीचे निकाल एका तासात समोर येणार आहेत.
दोन हजार सशस्त्र जवान तैनात
दरम्यान लिव्हरपूलमध्ये सर्वांचीच चाचणी घेण्यात येणार असल्यामुळे त्यादृष्टीने सर्वच तयारी करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणावर चाचणी कशी केली जावी आणि वेगवान पद्धतीने चाचणी कशी होईल हे देखील समजणार आहे. त्यामुळे इतर शहरात चाचणी घेण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा होणार आहे. संरक्षण मंत्री बेन वल्लास यांनी सांगितले की, कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता दोन हजार सशस्त्र जवान तैनात करण्यात येणार आहे. लिव्हरपूलमधील नागरिकांच्या सोयीसाठी सर्व काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.