MaharashtraNewsUpdate : “केबीसी” मध्ये “मनुस्मृती ” वर विचारलेल्या प्रश्नावरून “या ” भाजप आमदाराच्या भावना दुखावल्या

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात ” 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अनुयायांनी कोणता धर्म ग्रंथ जाळला होता? ” असा प्रश्न विचारल्यामुळे भाजप आमदार आणि माजी मुख्यमंत्र्यांचा पीए असलेल्या एका आमदाराने भावना दुखावल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालक अमिताभ बच्चन यांच्याविरुद्ध लातूर पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. अभिमन्यू पवार असे या आमदाराचे नाव आहे.
सोनी वाहिनीवरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाचे अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत आहे. 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमात बेजवाडा विल्सन आणि अनुप सोनी यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अनुयायांनी कोणता धर्म ग्रंथ जाळला होता? असा तो प्रश्न होता आणि त्याला पर्याय हे विष्णुपुराण, भगवत गीता, ऋग्वेद आणि मनुस्मृती असे होते. हा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी विचारला होता.
बाबासाहेब आंबेडकर यांचा तत्कालीन हिंदू धर्मांवरील, मनुस्मृतीवरील राग, मतभेद यांना उजाळा देऊन इतिहासातील जखमांच्या खपल्या काढून सौहार्दपणे एकमेकांसोबत राहणाऱ्या हिंदू-बौद्ध धर्मियांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रश्न विचारण्यात आला आहे, असा दावाही पवार यांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही पवार यांनी केली. तसेच अत्यंत सलोख्याने राहणार्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे या भाजप आमदाराचे म्हणणे आहे.
आपल्या देशात अनेक धर्म असतानाही प्रश्नाखालील सर्वच्या सर्व पर्याय जाणीवपूर्वक हिंदू धर्माशी निगडितच देण्यात आले. अशा कृतीतून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश देण्याचा तसेच जवळपास १ शतकापूर्वीची घटना चर्चेत आणून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा खोडसाळ प्रयत्न लपून राहत नाही.
हिंदू धर्म हा अत्यंत सर्जनशील व सर्वसमावेशक धर्म आहे. काळसुसंगत अनेक चांगले बदल आत्मसात करून हिंदू धर्म समृद्ध बनलेला आहे. पण प्सुडोसेक्युलॅरिझम चे ढोंग घेतलेले अनेक तथाकथित बुद्धीजीवी आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून नित्यनेमाने सहिष्णू हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावत असतात. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारण्यात आलेला प्रश्न हा त्याच विघातक प्रयत्नांचा भाग असून दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही असेही या आमदाराने म्हटले आहे.