PuneCrimeUpdate : पुण्यात अल्पवयीन अपहरण आणि सामूहिक बलात्कार , दोघांना अटक

पुण्याच्या हडपसर हद्दीतील १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी दोघा आरोपींना गुरूवारी रात्री अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. मुलीला फूस लावून अपहरण केल्याचे तिच्या आईवडिलांनी तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी सासवड येथे मुलगी सापडली. त्यावेळी चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ मुलीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर हडपसर पोलीस ठाण्याचे तपास पथक चौघा आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. गुरुवारी रात्री उशिरा दोन आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली. अन्य दोन आरोपींचा हडपसर पोलीस शोध घेत आहेत.